Sunday 1 January 2017

महाआरोग्य शिबिर उद्घाटन

महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णाला सेवा देण्याचा प्रयत्न
                            - पालकमंत्री गिरीष महाजन

       नाशिक दि.1 :- प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळावी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू आणि गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  गिरीष महाजन यांनी केले.

          हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे पालकमंत्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा.हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, चंदुभैय्या पटेल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, डॉ. सुलतान प्रधान, रिलायन्स फाऊंडेशनचे गुस्ताद डावर, महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज,  सोमेश्वरानंद सरस्वती, श्रीनाथजी महाराज आदि उपस्थित होते.

          शिबीर एक प्रकारचा आरोग्याचा महाकुंभ असल्याचे नमूद करून श्री.महाजन म्हणाले, ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्याची गरज आहे. त्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रुग्णांना सेवा देण्याचा हा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अनेक डॉक्टरांनी शिबिरासाठी वेळ दिला आहे.
 अनेक दानशूर व्यक्ती, संघटना, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था, शासनाचे विविध विभाग, धार्मिक संस्था आदींच्या बहुमूल्य सहकार्य मिळाले आहे. शिबिरासाठी 7 ट्रक औषधे आणण्यात आली आहेत. स्थानिक डॉक्टरांचेदेखील मोलाचे सहकार्य लाभले आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांनी सहाकार्य केल्याने आयोजन शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

शिबिराच्या माध्यमातून रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविता येते ही सर्वात मोठी समाधानाची बाब आहे. या कार्यातून समाजसेवकांची नवी पिढी तयार होते, असे सांगून शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या युवकांचे त्यांनी कौतुक केले. नववर्षाच्या प्रारंभी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात सातत्य ठेवण्यात येईल. कितीही खर्च आला तरी प्रत्येक गरजू रुग्णावर शस्त्रक्रीया करण्यात येईल, असे श्री.महाजन यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ मुख’ अभियानाच्या लोगोचे अनावरण आणि नेत्रदानावर आधारीत लघुपट ‘पुण्य’च्या पोस्टरचे अनावरण श्री.महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विविध पुस्तिकांचे प्रकाशनही करण्यात आले.

प्रास्ताविकात श्री.नाईक यांनी गरीबांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावे या सेवाभावनेने पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. शिबिरासाठी 450 डॉक्टर्सची सेवा उपलब्ध झाली असून आयुष, होमिओपॅथी, योगा, पंचकर्म, लठ्ठपणा आदि उपचारपद्धतींचादेखील समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाला डॉ.रमण देशपांडे, डॉ.बी.के.मिश्रा, डॉ.अमीत मायदेव, डॉ.झुनझुनवाला, डॉ.संजय शर्मा, डॉ.धैर्यशील सावंत, डॉ. शैलेश पुणतांबेकर, डॉ.एम.एल.चव्हाण, डॉ.श्रीरंग बिच्छु, आरोग्य संचालक डॉ.प्रविण शिनगारे, डॉ.शैलेश झवेरी, डॉ.दिलीप शहा, डॉ.राम प्रभू, डॉ.निर्मल सुर्या, डॉ.अशोक गुप्ता, डॉ. व्ही.डी. कोहली, डॉ.मानसिंग पवार, डॉ.खामगावकर, डॉ.गौतम, डॉ.लक्ष्मण खेडे, डॉ.बारपांडे, डॉ.म्हस्के, डॉ.जयश्री तोडकर, डॉ.अंजली पेठे, डॉ.अभय सद्रे, डॉ.बच्ची, डॉ. शैलेश जोगळेकर आदी उपस्थित होते.
----

क्षणचित्रे-
          सकाळी 8 वाजल्यापासून नोंदणी सुरूवात
          तालुकानिहाय नोंदणीची सुविधा
          पालकमंत्री गिरीष महाजन स्वत: संपर्णू व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.
          सकाळपासून प्रत्येक कक्षाला भेट देऊन त्यांनी आढावा घेतला.
       प्रत्येक आजाराच्या रुग्ण तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष
          रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
          दंतरोगाच्या तपासणीसाठी मोबाईल व्हॅनमध्ये सुसज्ज यंत्रणा
   सकाळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर आणि पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी शिबीरस्थळी भेट घेऊन व्यवस्थेचा आढावा घेतला.
         रुग्णांची रांगेत शिस्तबद्धरितीने तपासणी


         

          

No comments:

Post a Comment