Saturday 7 January 2017

मानव विकास मिशन

नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन योजना प्रस्तावित करा-भास्कर मुंडे


नाशिक दि.7: भौगोलिक क्षेत्र, नागरिकांच्या गरजा आणि साधनसामुग्रीची उपलब्धता लक्षात घेऊनच अधिकाऱ्यांनी मानव विकास मिशन अंतर्गत नव्या योजना प्रस्तावित कराव्यात. अशा योजना उपयुक्त असल्यास त्यांचा निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन मानव विकास आयुक्त भास्कर मुंडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मानव विकास मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., नियोजन उपआयुक्त के.एन.पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) पी.के. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एस.पी. जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशील वाकचौरे, जिल्हा शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे आदी उपस्थित होते.


श्री.मुंडे म्हणाले, मानव विकास मिशनच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात मानव विकास निर्देशांकात निश्चितपणे सुधारणा झाली आहे.  आरोग्य, शिक्षण, रोजगार या तीन मुद्यांच्या आधारे निर्देशांक निश्चित करण्यात  येतो. या अंतर्गत योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना त्या अधिक प्रभावी ठरण्यासाठी त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा. योजने अंतर्गत झालेल्या कामांच्या पुर्णत्वाचे दाखले वेळेवर सादर करावेत. कामे अधिकाधीक गुणवत्तापूर्ण होतील, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याने मानव विकास अंतर्गत चांगली कामगिरी केली असल्याचे ते म्हणाले
.
जिल्हा परिषदेने ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी राबविलेल्या उपक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना निवासी शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याबाबत प्रस्ताव सादर केल्यास त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. मानव विकास अंतर्गत तालुक्यात फिरत्या माती परिक्षण प्रयोगशाळेचा उपयोग वाढवावा, असे निर्देश त्यांनी दिले.

पुढील वर्षी गरजू मुलींना सायकल वाटपाबाबत जुलै अखेरपर्यंत लाभार्थी मुलींची यादी निश्चित करून सादर करावी आणि दिवाळीपर्यंत सायकल वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
बैठकीत मानव विकास मिशन अंतर्गत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. मानव विकास निर्देशांकात नाशिक राज्यात आठव्या क्रमांकावर असल्याची माहिती यावेळी,  नियोजन अधिकारी श्री.पाटील यांनी दिली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

-----

No comments:

Post a Comment