Saturday 21 January 2017

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

विधान परिषद नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक
उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींचे प्रशिक्षण संपन्न

       नाशिक, दि. 21 :-  विधान परिषद नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदान प्रक्रीयेबात विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना माहिती दिली.
          विभागीय आयुक्त कार्यालयात मतदान प्रक्रीयेबाबतच्या प्रशिक्षणात संपूर्ण प्रक्रीयेविषयी सादरीकरण करण्यात आले. श्री.डवले यांनी उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंकांचे यावेळी निरसन केले.

          प्रक्रीयेविषयी माहिती देताना ते म्हणाले, संपूर्ण मतदान प्रक्रीयेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी आणि मतदान प्रतिनिधी यापैकी एकाला उपस्थित राहता येईल. मतदान पसंती क्रमानुसार होणार असून मतदाराच्या निवडीनुसार त्याला 1,2,3,4,…. याप्रमाणे एकूण 17 पसंतीक्रम देता येतील. वरीलपैकी नाही (NOTA)चा पसंतीक्रमदेखील उपलब्ध असेल. पसंतीक्रम मराठी,इंग्रजी किंवा रोमन भाषेत अंकातच लिहीता येतील अन्यथा मतपत्रिका अवैध ठरेल.
          पसंतीक्रमांक 1 NOTA ला दिल्यास किंवा दोन उमेदवारासमोर 1 पसंतीक्रम  लिहील्यास मतपत्रिका अवैध ठरेल. त्याचप्रमाणे एकाच उमेदवारासमोर 1 पसंतीक्रम लिहिण्यासोबत इतरही पसंतीक्रम लिहील्यास, पसंतीक्रमासोबत इतर खुण किंवा चिन्ह केल्यास, मतदान अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या शाईच्या पेनऐवजी इतर पेनने पसंतीक्रम लिहील्यास मतपत्रिका अवैध ठरेल,अशी माहिती त्यांनी दिली.
          मतदान प्रकीयेबाबत विभागातील पाचही जिल्ह्यात अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात येत असून 2 फेबुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्राकडे जातील, असे त्यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रीया शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्याचे प्रशासनाचे प्रयत्न असल्याचे श्री.डवले म्हणाले.

----

No comments:

Post a Comment