Thursday 7 March 2019

आदर्श आचारसंहिता


आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी सज्ज रहावे-जिल्हाधिकारी
नाशिक, दि. 7 :- आगामी लोकसभा निवडणुक प्रक्रीयेदरम्यान आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी निवडणूक यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे.
निवडणूक कामकाजासाठी 23 प्रकारच्या समित्यांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक समितीसाठी स्वतंत्र समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. समित्यांना निवडणूकीची पूर्वतयारी येत्या एक-दोन दिवसात पुर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यावर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजवणी करण्याबाबत सर्व सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी यांना निर्देशित करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण झालेल्या क्षेत्राचे आणि ठिकाणांचे सर्वेक्षण होणार असून निवडणूक जाहीर झाल्यावर त्याबाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. निवडणूकीदरम्यान असे आढळल्यास गुन्हा दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. न्यायालयाने फरार घोषित केलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी आवश्यक माहिती पोलीस विभागाकडून मागविण्यात आली आहे.
विभागस्तरावर समन्वय कक्षाची स्थापना

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार नाशिक विभाग स्तरावर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता विभागस्तरावर निवडणूक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष निवडणूक कामांचा आढावा घेण्याचे व समन्वय साधण्याचे काम करणार आहे.
 विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या आदेशानुसार उपायुक्त रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कक्ष कार्यरत रहाणार आहे. यात सहायक आयुक्त उन्मेश महाजन, मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांच्यासह तहसीलदार व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आहे.
-----

No comments:

Post a Comment