Monday 11 March 2019

विभाग प्रमुख बैठक


आदर्श आचारसंहितेचे कटाक्षाने पालन करावे-जिल्हाधिकारी

नाशिक, दि. 11 :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून शासकीय अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे काटोकरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक आरती सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे, अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, लक्ष्मण  राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास  खेडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर आदी उपस्थित होते.

श्री.राधाकृष्णन म्हणाले, मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदान होण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन होणे आवश्यक आहे. आचारसंहितेचे पालन  योग्यप्रकारे झाल्यास निवडणूक प्रक्रीयेच्या पारदर्शकतेविषयी नागरिकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण होते. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रीयेसाठी तयार केलेल्या ई-सुविधांची माहिती संबंधिताना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले,धर्म, जात आणि पंथाच्या आधारे मतदारांना आवाहन करता येणार नाही. मतदानापूर्वी 48 तास प्रचार बंद राहील. प्रचार मिरवणूकीसाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मिरवणूकीत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतल्यानंतर एकावेळी 10 वाहने सहभागी होतील. अधिक वाहने असल्यास प्रत्येक 10 वाहनांमध्ये 100 मीटरचे अंतर असेल.
प्रशासनाच्या अनुमतीने मतदान केंद्रबाहेर बुथ लावताना केवळ एक टेबल आणि दोन खुर्च्या ठेवण्यास  परवानगी असेल. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारास सोबत केवळ तीन वाहने आणण्याची अनुमती असेल. ही  वाहने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयापासून 100 मीटर अंतरावर राहतील. प्रचारासाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रकाशनांवर प्रकाशक आणि प्रतींचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. प्रचारासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा उपयोग राजकीय पक्षांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेची माहिती देण्यात आली. निवडणूक प्रक्रीया पारदर्शकपणे आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे,असे आवाहन श्री.राधाकृष्णन यांनी केले.
बैठकीस भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आदी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 *****************

No comments:

Post a Comment