Sunday, 30 July 2017

बहुउद्देशीय शितगृह भूमिपूजन

वीज, पाणी आणि बाजारपेठ या त्रिसूत्रीद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करणार
                                                -देवेंद्र फडणवीस


नाशिक, दि.30 : शेतकऱ्याला वीज, पाणी आणि बाजारपेठ मिळावी या त्रिसूत्रीच्या आधारे शासन काम करीत असून त्याद्वारे शेतकऱ्याला सक्षम करीत त्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यात येईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
  लासगाव येथे भारतीय रेल्वे व लासलगांव विभाग सहकारी खरेदी विक्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय शितगृहाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सिमा हिरे, स्नेहलता कोल्हे, लासलगाव खरेदी विक्री संघाचे चेअरमन नानासाहेब पाटील, कॉनकारचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक व्ही.कल्याण रामा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.के. यादव, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.,  सुरेश बाबा पाटील आदी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले, कांद्याची बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात असण्यासाठी शेतमालाची साठवणूक करणे आणि योग्य दर मिळाल्यावर विकता येईल यासाठी आवश्यक व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने रेल्वेच्या सहकार्याने शितगृहाची  साखळी निर्माण करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. देशात उभारण्यात येणाऱ्या 227 पेकी 52 शितगृह महाराष्ट्रात उभारले जात आहे. त्यात्यापैकी 25 आता पूर्ण होतील आणि उर्वरीतही मंजूर करून घेण्यात आले असून तेदेखील लवकरच पुर्ण करण्यात येतील. कोल्ड स्टोरेजसाठी वीज दर कमी करण्याचादेखील शासनाचा विचार आहे.  

शासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे आणि शेतकऱ्यांच्या कष्टामुळे गेल्या दोन वर्षात शेतमालाच्या निर्यातीत वाढ झाली आहे. ग्रेप नेटच्या माध्यमातून 30 हजार द्राक्षबागांची नोंदणी झाली असून द्राक्ष निर्यात गेल्यावर्षी दुप्पट झाली आहे. अनार नेट आणि मँगो नेटच्या माध्यमातून डाळींब आणि आंब्याच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. टोमॅटो केचअप प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी जपानी कंपनीसोबत करार करण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनाला हमी भाव मिळून दराच्या चढउतारीचा त्याच्यावर परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्याला अबाधीत वीज पुरवठा करण्यासाठी शासनाने सोलरपंप देण्याची योजना सुरू केली आहे. मात्र त्याच्या मोठ्या संख्येने वितरणावर असणाऱ्या मर्यादा लक्षात घेता शासनाने सोलर फिडर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याची सुरुवात राळेगणसिद्धी येथून करण्यात येईल. सोलर फिडरमुळे शेतकऱ्याला अविरत वीज पुरवठा होऊन उत्पादन वाढण्यासाठी मदत होणार आहे.
नाशिकसह मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटविण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोलाची कामगिरी केली असल्याचे सांगून श्री.फडणवीस म्हणाले, नार-तापी-नर्मदा आणि दमणगंगा-पिंजार योजनेबाबत ऐतिहासिक करार करण्यात आला आहे. नार-पार खोऱ्यातून गिरणा खोऱ्यात 10 टीएमसी पेक्षा जास्त पाणी आणण्यात येणार असून या कामासाठी साडेचार हजार कोटी खर्च होणार आहे. दुष्काळी तालुक्यांसाठी पाण्याचे नियोजन करणे त्यामुळे सोईचे होईल.

पार खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात पाणी आणले जाईल आणि त्यापैकी 3 टीएमसी पाणी पालखेड समुहात येणार आहे. परसवाडी पोहोच कालव्यासाठी त्यामुळे अधिक पाणी उपलब्ध होईल. दमणगंगा खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात 25 ते 30 टीएमसी पाणी येणार असल्याने पाण्याची तुट संपुष्टात येईल. नाशिक मधील चांदवड, येवला आणि सिन्नर सारख्या नेहमी टंचाईला सामोरे जाणाऱ्या भागासोबतच मराठवाड्यालादेखील याचा लाभ होईल.
 दमणगंगा-एकदरे-गंगापुर योजनेतून 5 टीएमसी पाणी आणि वैतरणा- दमणगंगा- कडवा योजनेतून 7.3 टीएमसी पाणी मिळणार आहे. खानदेश आणि मराठवाडा ‘सुजलाम सुफलाम’ होण्यासाठी या योजना उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रेल्वेच्या माध्यमातून विदर्भासाठी 21 हजार कोटींचे, मराठवाड्यासाठी 19 हजार कोटींचे आणि उत्तर महाराष्ट्रात 22 हजार कोटींचे प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. राज्यातील एकूण एक लाख कोटींचे प्रकल्प रेल्वेच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

 रेल्वेमंत्री श्री.प्रभु म्हणाले, राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध असून त्यादृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून या प्रयत्नांना चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून शितगृहांची उभारणी करण्यात येत आहे. ही सुरुवात असून जगातले सर्वोत्तम तंत्रज्ञान उपयोगात आणीत शेतकऱ्यांचा माल प्रक्रिया करुन बाजारात नेण्याच्या दृष्टीने कन्टेनर कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून राज्याला सर्व सहकार्य करण्यात येईल.
राज्य शासनासोबत रेल्वेने अनेक प्रकल्प राबविले आहेत. फळ प्रक्रिया मंत्रालयाशी चर्चा करण्यात आली असून त्यासाठी आवश्यकतेनुसार शितगृहाची साखळी निर्माण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कामायनी एक्सप्रेसला लासलगांव येथे जाताना- येताना थांबा देण्याची घोषणाही त्यांनी केली.
प्रास्ताविकात नानासाहेब पाटील आणि व्ही कल्याण रामा यांनी शीतगृह प्रकल्पाविषयी माहिती दिली.

----

No comments:

Post a Comment