Wednesday, 12 September 2018

लोकराज्य वाचक मेळावा


पर्यटनात क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी-नितीन मुंडावरे

          नाशिक, 12 : देशात पर्यटन क्षेत्राचा दिवसेंदिवस वेगाने विस्तार होत असून पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यानी पारंपरिक दृष्टीकोन बाजूला सारून या संधींचा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयीन जीवनापासून पूर्वतयारी करावी, असे प्रतिपादन  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे यांनी केले.  
पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय येथे आयोजित लोकराज्य वाचक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, प्राचार्य प्र.ला.ठोके, उपप्राचार्य सुनिल हिंगणे आदी उपस्थित होते.

मुंडावरे म्हणाले, पर्यटन क्षेत्रात चांगले भविष्य घडविण्यासाठी आत्मविश्वास, परिश्रम आणि संवादकौशल्याची नितांत गरज आहे.  पर्यटन क्षेत्रात एकूण रोजगाराच्या आठ टक्के संधी उपलब्ध असताना शासकीय सेवेत या तुलनेत अत्यंत कमी संधी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पर्यटनासारख्या नव्या क्षेत्रात करिअर घडविण्याबाबत विचार करावा.

पर्यटन क्षेत्रात हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट  मॅनेजमेंट, टूर ऑपरेटर, टूर गाईड, हवाई सुंदरी, भाषांतरकार, निवास व न्याहारी योजना, शेफ, पारंरिक कला सादरीकरण, सोमेलिअर्स, रिसॉर्ट अशा विविध संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासात व्यक्तिश: लोकराज्यचा फायदा झाल्याचे श्री.मुंडावरे म्हणाले.

जीवन घडविण्यासाठी जीवनात वाचनाला महत्व असल्याचे प्राचार्य ठोके यांनी सांगितले. डॉ. मोघे यांनी लोकराज्य वाचक अभियान व माहितीदूत उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांना समाजाशी जोडण्यासाठी युवा माहिती दूत उपक्रम महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.       00000

No comments:

Post a Comment