Thursday, 15 February 2018

कायदा-सुव्यवस्थेचा आढावा

गृहराज्यमंत्र्यांनी घेतला शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा

नाशिक, दि.15: राज्याचे गृह राज्यमंत्री  (शहरे) डॉ. रणजीत पाटील यांनी पोलीस आयुक्तालय येथे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. शहरात शाळांच्या परिसरात गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांची विक्री होणार नाही याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी  दिले.
बैठकीस पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, उपआयुक्त माधुरी कांगणे, लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
डॉ.पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील शाळांचा परिसर तंबाखुजन्य पदार्थमुक्त करण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. शाळांच्या 100 मीटर परिसरात अशा पदार्थाची विक्री होणार नाही याकडे नियमितपणे लक्ष देण्यात यावे. आर्थिक गुन्ह्यांच्या संदर्भात प्राथमिक चौकशी तातडीने पुर्ण करावी. सायबर गुन्ह्यांबाबत आवश्यक असल्यास अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नाशिक शहर पोलीसांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. आर्थिक गुन्ह्याबाबत शहर पोलीसा केलेली कामगिरी स्तुत्य असल्याचे ते म्हणाले.

यावेळी श्री.सिंगल यांनी सादरीकरणाद्वारे शहर पोलिसांतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. हेल्मेटसक्तीमुळे अपघातात होणाऱ्या मृत्युंचे प्रमाण तुलनेने कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. टॅबच्या सहाय्याने पासपोर्ट -व्हेरीफिकेशन, नो हॉर्न डे, छोटा पोलीस, वाहतूक मित्र, बॉडी कॅमेऱ्याचा उपयोग, टूरिस्ट मोबाईल व्हॅन आदी विविध उपक्रमाची माहिती त्यांनी दिली.

डॉ.पाटील यांनी यावेळी पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधून माहिती  घेतली. नाशिक शहर पोलिसतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘नाशिक मॅरेथॅान’च्या टीशर्टचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. वाढदिवस असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी गृहराज्यमंत्री पाटील यांनी सायबर लॅबला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.       ----

No comments:

Post a Comment