Friday, 2 March 2018

सहकार आढावा बैठक


कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत संधी
                                                       - सुभाष देशमुख ख्Pz

      
नाशिक,दि.2 :- जास्तीत जास्त शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न असून काही कारणास्तव अर्ज भरु न शकलेल्या पात्र शेतकऱ्यांना 31 मार्च 2018 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार विभागाच्या आढावा बैठकप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खसदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर, अनिल कदम, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) निळकंठ करे, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक दिग्विजय आहेर,  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल आदी उपस्थित होते.  

श्री. देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार आत्तापर्यत राज्यात 25 जिल्ह्यातील कर्जमाफी योजनेच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला आहे. अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा देतानाच त्यांचे उत्पन्न  वाढीसाठी विविध उपाययोजनांवर अंमलबजावणी केली जात आहे. एकरकमी  परतफेड योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना विक्री केलेल्या शेतमालाची रक्कम व्यापारी आणि बँकांनी आरटीजीएस पद्धतीचा वापर करून त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल याची दक्षता घ्यावी आणि याबाबत सर्व सहाय्यक निबंधकांनी नियंत्रण ठेवावे, अशा सुचना श्री.देशमुख यांनी दिल्या.

चांगला भाव आल्यानंतरच शेतकऱ्यांनी उत्पादने विकणे गरजेचे असून यासाठी शेतमाल तारण योजना त्यांचपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. सोयाबीनबरोबरच इतर उत्पादनांसाठीदेखील या पद्धतीचा उपयोग करणे गरजेचे आहे. कांदा, मका, गहू आदी पिकांचा उपयोग शेतकऱ्यांनी  शेतमाल तारण योजनेसाठी करून घेतल्यास त्यांना त्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे अधिकाधीक  शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. देशमुख म्हणाले, पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या हित संरक्षणासाठी कायद्यात बदल केले असून यासाठी स्थैर्य निधी निर्माण करण्यात येईल. याबाबत सहकारी संस्थांवर नियंत्रणासाठी नियामक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गावांमधील विविध कार्यकारी सहकारी विकास संस्थांनी नवीन व्यवसायांमध्ये उतरून गावातील उत्पनांचे स्त्रोत वाढवण्यासाठी शासन प्रोत्साहन देत असून यामुळे काही ठिकाणी यश आल्याचे दिसून आले आहे.  मातेरेवाडी आणि कोंढार येथील सहाकारी संस्थेनी सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची संकल्पना राज्यात पोहोचविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कृषि उत्पन्न बाजार समित्या संचालक मंडळात उपनिबंधक , सहाय्यक निबंधक हे पदसिद्ध संचालक असल्याने त्यांनी बाजार समितीच्या प्रत्येक संचालक मंडळ सभेस उपस्थित राहून आपले मत नोंदवावे. उप/सहाय्यक निबंधकांच्या अनुपस्थितीबाबत आढावा घेण्यात यावा व बाजार समितीने चुकीचे निर्णय घेतले असल्यास निबंधकांना जबाबदार धरण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
शासनाने अडचणीतील पतसंस्थांना 2010 मध्ये दिलेल्या 200 कोटींच्या अर्थसहाय्याबाबत मंत्री महोदयांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील 11 पतसंस्थांनी दिलेल्या 262.17 लाख अर्थसहाय्यापैकी 242.74 लाख रक्कम शासनास परत केल्याबद्दल आणि झालेल्या वसुलीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. अटल महापणन विकास अभियान अंतर्गत प्रत्येक तालुक्यात 20 विविध कार्यकारी संस्थांनी नवीन व्यवसाय सुरू करावा आणि त्याबाबतचा मासिक आढावा जिल्हा उपनिबंधकांनी घ्यावा, असे श्री.देशमुख यांनी सांगितले.
यावेळी श्री. करे यांनी विभाच्या विविध योजनांबाबतची माहिती सादर केली. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाबाबत श्री. बकाल यांनी सादरीकरण केले. बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती घेऊन बँकेच्या मागणीबद्दल सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री महोदयांनी सांगितले.

बैठकीस  जिल्ह्यातील सर्व सहायक निबंधक (सहकार संस्था), कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव उपस्थित होते
    00000


Tuesday, 27 February 2018

मराठी भाषा गौरव दिन


विविध विषयांवर मराठीतून साहित्यनिर्मीती होणे आवश्यक - झगडे



नाशिक दि. 27: मराठी भाषेच्या प्रगल्भतेसाठी  आणि संवर्धनासाठी विविध विषयांवरील साहित्यनिर्मीती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर आयुक्त जोतिबा पाटील, उपायुक्त दिलीप स्वामी, सुखदेव बनकर, प्रविण पुरी, प्र.माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे, पी.बी. वाघमोडे, उन्मेष महाजन, तहसिलदार एस. डी. मोहिते आदी उपस्थित होते.
 श्री. झगडे म्हणाले, मराठी भाषेत लवचिकता आहे. काळानुसार मराठी भाषेच्या स्वरुपात आणि उपयोगत बदल झाले. भाषेत होणारे बदल स्वीकारणे आवश्यक आहे. दीर्घकाळापासून असलेली मराठी भाषेची वैभवशाली परंपरा लक्षात घेता तिच्या विकासाबाबत भिती बाळगण्याचे कारण नाही. इतर भाषिकांमध्ये मराठी साहित्य पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कुसुमाग्रजांच्या कविततेत जीवनाचे तत्वज्ञान सामावले आहे. त्यांच्या जन्मदिनी मराठी भाषेच्या विकासाबाबत चर्चा व्हावी यासाठी शासनातर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात येते, असेही श्री.झगडे यांनी सांगितले. समाजमाध्यमात मराठीचे प्रमाण वाढत असून मराठी साहित्याची श्रीमंती  लक्षात घेता  येत्या काळात मराठी भाषा महाजालावर अधिक विकसीत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुसुमाग्रजांच्या कवितेत निसर्ग आणि जीवन यांचा सुंदर समन्वय-   किशोर पाठक

          कुसुमाग्रजांच्या कविततेत निसर्ग आणि जीवन यांचा सुंदर समन्वय आहे. त्यांनी प्रेमाची कविता लिहिताना जगण्याची शिकवण दिली आणि माणूसकीचा धागा सोडला नाही, असे प्रतिपादन कवी किशोर पाठक यांनी यावेळी केले.
 इंग्रजी भाषा जगाचे ज्ञान मिळवण्यासाठी असणारी खिडकी असली तरी जीवनाचे ज्ञान मिळवण्याचे मराठी भाषा हे मुख्य दार  आहे.  मराठी भाषा मातीशी आणि मनाशी जोडली गेलेली भाषा आहे. मराठी साहित्य ही  प्रकाशकिरणे आहेत. ती जीवनातून नष्ट झाली तर जीवन निरर्थक होईल. म्हणून मराठी भाषा बोलण्याचा आग्रह सर्वांनी धरावा, असे आवाहन त्यांनी केले.

कुसुमाग्रजांच्या सहवासाने चैतन्याचा अनुभव मिळायचा अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करतांना  त्यांनी कुसुमाग्रजांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. कुसुमाग्रजांनी आपल्या जीवनात कायम मराठी भाषा आणि माणसाला जपले,असेही ते म्हणाले.

          श्री. स्वामी म्हणाले, स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेसोबत मराठी भाषा ही देखील अत्यंत महत्वाची आहे. मराठी भाषेचा व्यवहारात योग्य वापर होण्यासाठी  वाचनसंस्कृती विकसीत होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. संत साहित्यात आणि आधुनिक कवींनीदेखील मराठी भाषेची थोरवी गायली असल्याचे सांगून मराठी भाषेचे महत्व विविध स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनातर्फे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.मोघे यांनीदेखील आपले विचार व्यक्त केले.  तहसिलदार एस.डी. मोहिते यांनी आभर व्यक्त केले.
पुस्तकांचे प्रदर्शन कौतुकास्पद उपक्रम-   विभागीय आयुक्त

           मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नाशिक विभागीय माहिती कार्यालयामार्फत विभागीय आयुक्त कार्यालयात लोकराज्य आणि मराठी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. प्रदर्शनात असलेले दुर्मिळ लोकराज्य अंक संग्राह्य आणि उपयुक्त असून प्रदर्शनचा उपक्रम कौतुकास्पद उपक्रम आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

 यावेळी उपायुक्त दिलीप स्वामी, सुखदेव बनकर, प्रविण पुरी, माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे, पी.बी. वाघमोडे, उन्मेष महाजन, तहसिलदार श्रीमती एस. डी. मोहिते, सहायक संचालक अर्चना देशमुख यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000

Sunday, 25 February 2018

जिल्हा कृषि महोत्सव


नाशिक जिल्हा कृषि महोत्सव 2018
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषि महोत्सवाचा समारोप

नाशिक, 25 : राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन         यांच्या उपस्थितीत पाच दिवस चाललेल्या नाशिक जिल्हा कृषि महोत्सवाचा समारोप करण्यात आला.
 कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तुकाराम जगताप, लक्ष्मण सावजी, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे, महेश हिरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.महाजन म्हणाले, शेतकऱ्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञाना आत्मसात करून त्याचा शेतात उपयोग करावा. जगभरात लागणारे नवे शोध अशा ठिकाणी पहायला मिळतात. म्हणून शासनाने प्रत्येक जिल्ह्यात असे प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा अधिकाधीक लाभ शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी विपणन आणि व्यवस्थापन कौशल्य वापरल्यास त्यांना अधिक लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीवर भर दिल्यास शहरातील ग्राहकांना आकर्षित करता येईल आणि शेतमालाला अधिक भाव मिळेल. जिल्ह्यातला शेतकरी प्रयोगशील असून कौशल्याचा चांगला वापर करीत आहे. शेतकऱ्याला पाणी आणि वीज देऊन शाश्वत शेतीकडे वळविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे श्री.महाजन म्हणाले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते चांगली कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. त्यांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीद्वारे तयार करण्यात आलेल्या जलदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी श्री.महाजन यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली.
शेतकरी आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद
पाच दिवस  चाललेल्या कृषि महोत्सवाला शेतकरी आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.शेवटच्या दिवशी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दुपारच्या सत्रात ‘डाळींब व द्राक्षे’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होतो. अहमदनगर जिल्ह्यातील बाबासाहेब गोरे आणि सांगली‍ जिल्ह्यातल प्रा.वसंत माळी यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.
प्रदर्शनाला दीड लाखापेक्षा अधिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी भेट दिली. तसेच सुमारे दीड कोटी रुपयांच्या उत्पादनांची विक्री  पाच दिवसात झाली. 24 शेतकऱ्यांचे खरेदीदारांशी करार करण्यात आले आहेत, अशी माहिती श्री.कांबळे यांनी दिली.
                                                                   ----

कार्यक्षम आमदार पुरस्कार


‘सावाना’च्या पुरस्कारामुळे जनसेवेची प्रेरणा मिळेल-गिरीष महाजन

नाशिक 25 : सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे प्रदान करण्यात आलेल्या माजी आमदार  कै.माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या कार्यक्षम आमदार पुरस्कारामुळे जनसेवेची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
          औरंगाबादकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री.महाजन यांचा पद्मश्री डॉ.अभय बंग यांच्या हस्ते कार्यक्षम आमदार पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्याध्यक्ष अभिजित बगदे, सचिव श्रीकांत बेणी, संपादक शैलेद्र तनपुरे, भानुदास शौचे आदी उपस्थित होते.

 श्री.महाजन म्हणाले, विधानसभा हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. याठिकाणी वंचितांचे प्रश्न मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. गरिबांच्या मुलांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे आणि गरजूंना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावा याकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न आहे. सार्वजनिक जीवनात वावरतांना व्यक्तिगत प्रतिष्ठेपेक्षा जनतेचे प्रश्न सोडविण्यात जास्त समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक शहर संस्कृतिचे माहेरघर असल्याचा उल्लेख करून सार्वजनिक वाचनालय हा सांस्कृतिक चळवळ पुढे नेणारा शहराचा मानबिंदू आहे, अशा शब्दात त्यांनी वाचनालयाच्या कामगिरीचा गौरवपुर्ण उल्लेख केला. वाचनालयाचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुरस्कार कोणी दिला आणि कोणाच्या हातून मिळाला याला महत्व असल्याचे नमूद करून  डॉ.बंग यांच्यासारख्या नि:स्वार्थ भावनेने काम करणाऱ्या  सेवाभावी व्यक्तीच्या हातून पुरस्कार मिळणे हा जीवनातील आनंदाचा क्षण असल्याचे श्री.महाजन म्हणाले.

पुरस्कारासाठी करण्यात आलेली श्री.महाजन यांची ओळख योग्‍य असल्याचा उल्लेख करीत डॉ. बंग म्हणाले, पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आणि त्या व्यक्तिचे चारित्र्य कसे आहे यावरून पुरस्काराची उंची ठरते. सावानातर्फे देण्यात येणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार कर्तबगार व्यक्तिंना देण्यात आल्याने त्याला विशेष महत्व आहे. श्री.महाजन स्वस्थ जीवनशैलीचे आदर्श असल्याने    तसेच प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत असल्याने त्यांची पुरस्कारासाठी निवड योग्य असल्याचे , त्यांनी सांगितले.
आरोग्याचे विविध प्रश्न समोर येत असताना निरोगी जीवनशैलीचा वापर दैनंदिन जीवनात करणे आवश्यक आहे. रोगनिर्मितीच्या नव्या कारणांचे समाजातून उच्चाटन होणे आवश्यक असून त्यासाठी वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिंनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्री.बेणी यांनी पुरस्कार निवडीविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुलाखतीतून प्रकटले जीवनातील विविध पैलू

तत्पूर्वी श्री.महाजन यांची त्यांचे मित्र एम.एम.पाटील आणि संपादक श्रीमंत माने यांनी प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीत विचारल्या गेलेल्या प्रश्नांना पालकमंत्र्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
नाशिकला सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्याची वैभवशाली परंपरा असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री पद भुषवितांना विशेष समाधान मिळते असे त्यांनी सांगितले.
एका कौटुंबिक प्रश्नाला उत्तर देताना मुलगा-मुलगी असा भेद करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांच्या वागणुकीमुळे वृद्धाश्रमात राहणाऱ्या माता-पित्यांच्या व्यथा मांडतांना ते काहीसे भावूकही झाले. आपली संस्कृती भेदाची नसल्याने असा लिंगभेद चुकीचा असल्याचे श्री.महाजन म्हणाले.

जलसंपदा विभागाच्या कामाविषयी बोलताना शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांना वीज आणि पाणी देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राच्या सहाय्याने सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी अधिक निधी उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचनाकडे वळवावे लागेल,असेही ते म्हणाले.
श्री.महाजन यांनी आपला स्वभाव, राजकीय कारकिर्द, कुटुंबातील संस्कार याविषयी विचारलेल्या प्रश्नांना तेवढ्याच दिलखुलासपणे उत्तरे दिली. कुंभमेळ्याचे जनतेच्या सहकार्याने झालेले यशस्वी आयोजन विशेष समाधन देणारे होते, असेही ते म्हणाले.
----

Saturday, 24 February 2018

डांगी जनावर प्रर्दशन


 ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी देणार- दादाजी भुसे

          नाशिक दि.24- गावांच्या विकासाची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतींना स्व:ताची चांगली इमारत नसल्याने एक हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायतीची चांगली इमारत बांधण्यासाठी राज्यसरकार निधी उपलब्ध करून देईल,  असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
          इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे ग्रामपंचायत घोटी व जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित डांगी जनावरांच्या प्रर्दशनातील बक्षीस वितरण  प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, सरपंच कोंडाबाई बोटे, उपसरपंच आशा जाधव, उदय सांगळे, प्रा एस. डी. तायडे, निवृत्ती जाधव व सुर्यकांत भागडे आदी उपस्थित होते.

          श्री. भुसे म्हणाले, ग्रामीण भागालादेखील शहरांप्रमाणे सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. चांगल्या शाळा, नागरिकांना राहण्यासाठी घरे, ग्रामपंचायतींची कार्यालये आदीसाठी शासन विविध योजनांची अमंजबजावणी करीत आहे. चांगल्या शिक्षणाच्या सुविधा देण्याच्या प्रयत्नांमुळे जून 2018 पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा डिजीटल करणे व शाळांना ई-लर्निंग सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

 गावठाणातील शासकीय जमिनींवर रहाणाऱ्या  रहिवाश्यांना स्वता:च्या घरात  रहाण्यासाठी संबंधीत जागा त्यांच्या नावावर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या लाभार्थ्यांना रहिवाशी जागेचा लाभ मिळावा यासाठी संबंधित यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
          ते म्हणाले, इगतपुरी तालुका हा मुंबई, मराठवाडा, नाशिक यासह विविध तालुके व जिल्ह्यांना पाणी पुरविण्याचे काम करतो, पण येथील जनतेला उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यांनादेखील धरणांतील पाणी उपलब्ध व्हावे यासाठी उपाययोजना करण्यात येईल.
 डांगी जनावरांचे प्रदर्शन हा सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या काळातदेखील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. येथे लाखो रूपये किंमतीची डांगी जनावरे पहावयास मिळतात. यावरून शेतकऱ्यांचे या जनावरांवरचे प्रेम दिसून येते, असे श्री. भुसे म्हणाले.

          खासदार गोडसे यांनी प्रदर्शन व यांत्रिकी परंपरा 48 वर्षापासून सुरू असून ग्रामीण जनतेच्या प्रतिसादामुळे ग्राममहसूलात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने परिसरातील गावे व जिल्ह्यांना याचा चांगला फायदा होतो, असे सांगितले.
          22 ते 25 फेब्रुवारी 2018 या कालावधीत प्रदर्शनाचे आयोजन केले असून येथे शेती, औद्योगिक, औजारे, दुध आदी कारणांसाठी वापरात येणाऱ्या जनावरांचे प्रदर्शन विक्री केली जाते. तसेच ट्रॅक्टर, खते विविध कृषी उपयोगी साहित्याचे स्टॉल्स प्रदर्शनात असून यात्रेला नागरीकांचा मोठा प्रतिसाद आहे.

यावेळी विविध प्रकारात उत्तम असलेल्या जनावरांच्या मालकांच्या सत्कार यावेळी रोख पारिताषिके व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
पारितोषिके मिळालेली जनावरांचे प्रकार व त्यांच्या मालकांची नावे पुढील प्रमाणे आहे.
 डांगी वळू (सहा दात)  चॅम्पियन पुरस्कारचंद्रकांत बेंडकोळी, कोकणगाव ता. अकोले, जि. अहमदनगर. डांगी वळू (चार दात)- सदाशिव बेंडकोळी, अकोले जि. अहमदनगर.  डांगी वळू ( जुळलेले)- रोहित रमेश मोरे, आझादखिंड , इगतपुरी.
डांगी गायमालक नवनाथ्तुपे, डांगी दुभती गायमालक दादा पाटील बोरसे, खिलार वळू( दोन दात )- मालक चांगदेव चोपडे, खिलार वळू( चार दात ) – मालक गोरख थिटे याचबरोबर सदाशिव सदगिर, ज्ञानदेव कासार, भागवत वाबळे आदीं मालकांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
00000



कृषि प्रदर्शन

प्रदर्शनाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती

नाशिक दि. 23- कृषि महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येत आहे. आत्मा, कृषि, रेशिम उद्योग आणि मत्स्य व्यवसायच्या दालनाला अधिक प्रतिसाद मिळतो आहे. विशेष म्हणजे तरुण शेतकरी विविध योजनांविषयी माहिती घेताना दिसत आहेत.

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय यांनी बागायती शेती करताना शेततळ्यात कटला, रोहू, सिप्रिंन्स माशांचे उत्पादन आणि माशांचा खत म्हणून कसा वापर करता येईल याविषयी माहिती प्रदर्शित केली आहे. याठिकाणी लहान ड्रममध्ये मासे सोडलेले असल्याने शेतकरी याकडे आकर्षित होत आहेत.

जिल्हा रेशीम कार्यालयाने रेशीम किटकांपासून शाश्वत शेतीची माहिती प्रदर्शित केली आहे. तुती बागेस किटकनाशक आणि बुरशीनाशकांचा उपयोग करावा लागत नाही. एकदा तुतीची लागवड केल्यानंतर 15 वर्ष लागवड करावी लागत नाही. अशी उपयुक्त माहिती देताना शाश्वत शेतीचे महत्व विविध प्रतिकृतींद्वारे प्रदर्शित करण्यात आले आहे.

कृषि विभागाने जलुयक्त शिवार अभियानासह विविध योजनांची माहिती प्रदर्शित केली आहे. तर आत्माच्या दालनाद्वारे सेंद्रीय शेती, प्रशिक्षण, क्षेत्रभेटी, परंपरागत कृषी विकास, गांडुळ खत निर्मिती, उत्पादकता वाढ आदींची माहिती देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना पतपुरवठ्याची माहिती विविध बँकांच्या दालनातून देण्यात येत आहे. सामाजिक वनीकरण विभाग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, जिल्हा कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळ, महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण आदी विविध दालनांद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे.
----

‘कांदा व भाजीपाला’ परिसंवादा


नाशिक जिल्हा कृषि महोत्सव 2018
जैविक खते व पिके ही काळाची गरज-डॉ.श्रीधर देसले

नाशिक, 24 : उत्पादनवाढीसाठी जैविक खते आणि पिके ही काळाची गरज असल्याचे मत धुळे येथील कृषि शास्त्रज्ञ डॉ.श्रीधर देसले यांनी व्यक्त केले.  
कृषि विभाग आणि कृषि व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने नाशिक कृषी महोत्सवात ‘कांदा व भाजीपाला’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.  यावेळी प्रकल्प संचालक अशोक कांबळे,  उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे, गोकुळ वाघ, गणेश वाकळे, तुषार आमले, संजय पारडे आदी उपस्थित हेते.  

डॉ. देसले म्हणाले, जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी मुख्य, दुय्यम आणि सुक्ष्म अन्नद्रव्याचा अभ्यास करून खतांचा वापर करावा. त्यानंतरच उत्पादक क्षेत्राचा विचार करायला हवा. जमिनीनुसार योग्य पीक निवडल्यास उत्पादनात यश मिळते. सध्या सुक्ष्म अन्नपदार्थ, गंधक, पालाश कमी झाल्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. म्हणून माती परिक्षणानंतर खतांचा वापर करावा तसेच हवामानाच्या बदलानुसार करावयाच्या उपययोजनांचादेखील विचार शेतकऱ्यांनी करावा, अशी सुचना त्यांनी केली.
कांद्याचे पीक हंगामानुसार बदलणारे असल्याने शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. कांदा पिकाच्या आजूबाजूस मक्याची लागवड करावी. बुरशीमुळे बियाण्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गंधक, सुक्ष्म पदार्थ, पालाश यांची मात्रा योग्य प्रमाणात द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
श्री.वाळके, श्री.शेटे यांनीदेखील भाजीपाला उत्पादनाविषयी मार्गदर्शन केले.
-----