Saturday, 25 November 2017

शतायुषी संस्था संवाद संमेलन

राज्यात शंभर आंतराष्ट्रीय शाळा सुरु करणार-विनोद तावडे

नाशिक दि.25 :- जागतिक पातळीवर राज्यातील विद्यार्थ्यांची ओळख निर्माण होण्यासाठी राज्यात आंतराष्ट्रीय पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या 100 आंतराष्ट्रीय शाळा सुरु केल्या जातील, त्यामधील पहिली शाळा नंदुरबार येथे सुरु करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्याक व वक्फबोर्ड, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले.

          यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ  येथे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'शतायुषी संस्था संवाद संमेलना'त ते बोलत होते. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर, कार्याध्यक्ष महेश दाबक, शिक्षणतज्ज्ञ सुमनताई करंदीकर आदी उपस्थित होते.

           श्री.तावडे म्हणाले, शिक्षण व्यवस्थेत बदल स्विकारण्यासाठी मोकळेपणा स्विकारण्याची तयारी ठेवण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्रातील विकास व बदलांसाठी वेगळे मार्ग  चोखाळणाऱ्या शिक्षणसंस्थांच्या मागे शासन भक्कमपणे उभे राहिल.

राज्यातील जुन्या व जास्त शाळा असणाऱ्या संस्थांना माध्यमिक शालांत परिक्षा घेण्यासाठी स्वायत्तता देण्याचा विचार असून मुंबई सारख्या महानगरातील नामांकित शाळातील विद्यार्थी व दुर्गम ग्रामिण भागातील विद्यार्थी यांना एकाच पातळीवरील परिक्षा देण्याची यामुळे गरज राहाणार नाही, असे  त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, शाळांमधील बिगर शिक्षक कर्मचाऱ्यांची पदभरतीसाठी विद्यार्थी संख्या हा निकष ठरविण्यात येणार आहे. शिक्षक भरतीसाठी संस्थांना मर्यादित स्वरुपात अधिकार असतील. शासनाने राज्यस्तरावर निवड केलेल्या यादीतील शिक्षकांना मुलाखतीद्वारे ते नियुक्ती देऊ शकतील.
यावेळी शिक्षकांना देण्यात येणारी शाळाबाह्य कामे दिल जाऊ नये असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना विविध प्रसंगांच्या निमित्ताने प्रभात फेऱ्यांच्या माध्यमातून रस्त्यांवर उपक्रमांसाठी सहभागी करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत, असे श्री.तावडे म्हणाले.

मंत्री महोदयांनी संस्थेच्या दिर्घ वाटचालीचा गौरव करताना सांगितले 100 वर्षे शाळा चालवणे सोपे नाही, त्याहूनही त्या काळात शाळा सुरु करणे देखील अवघड होते. चांगले काम करणाऱ्या या संस्थांतून येणारे नवे विचार स्विकारण्यात येतील, असे शिक्षणमंत्री म्हणाले.
याप्रसंगी श्री. दाबक यांनी प्रास्तविक केले. तसेच डॉ. काकतकर, श्रीमती करंदीकर यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलत्या परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या गरजा, पालकांच्या अपेक्षा आदींबाबत विचार व्यक्त केले. यावेळी मंत्रीमहोदयांनी उपस्थितांशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात संवाद साधला.

----

Friday, 24 November 2017

प्लास्टिक बंदी बैठक

प्लास्टिक बंदीसाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा-रामदास कदम

     नाशिक दि. 24 : प्लास्टिक बंदीसंदर्भात कायदा करतांना त्याबाबतची मते जाणून घेतली जातील, त्याचप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीदेखील सर्वांचा सहभाग देखील महत्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले.

        महाराष्ट्र पर्यावरणीय अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था (मित्रा) येथे प्लास्टिक बंदी धोरणाबाबत आयोजित विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, धुळे जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, नंदुरबार जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह विभागातील सर्व जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त, नगरपरिषदांचे मुख्यधिकारी उपस्थित होते. 

         
श्री. कदम म्हणाले, प्लास्टिकवर कायमस्वरूपी बंदी आणणाऱ्या कायद्याची अंमलबाजावणी मार्च 2018 पासून करण्यात येणार आहे. तत्पूर्वी राज्यातील अधिकाऱ्यांनी चर्चेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याच्या मनात या प्रक्रीयेत आपला सहभाग असल्याची भावना मनात राहील. परिणामकारक अंमलबजावणीसाठी आतापासूनच प्लास्टिक वापरामुळे मानवी आरोग्यावर व पर्यावरणवर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत जनजागृती  करण्यात यावी.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक बंदी जशी महत्वाची आहे, त्याचप्रमाणे वृक्षलागवड करणेदेखील महत्वाचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याने 100 टक्के प्लास्टिकबंदीसाठी सर्वस्तरावरून जनजागृती करून प्लास्टिक ऐवजी पर्यायी वस्तूंचा वापर करण्याबाबत माहिती देण्यात यावी, असे त्यांनी  सांगितले.


        श्री. गवई म्हणाले, पर्यावरणातील हानीकारक घटकांमधील प्लास्टिक हा सर्वात मोठा घटक असल्याने त्याच्या उत्पादनावरच बंदी आणणे आवश्यक झाले आहे, त्याअनुषंगाने कार्यवाहीदेखील सुरू आहे. बदल घडवून आणण्यासाठी कायद्याबरोबरच मानसिकतेत परिवर्तन होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.  

        श्री. झगडे म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामसभांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत ठराव करण्यात यावेत. मानवी आरोग्य हे पर्यावरणावरच अवलंबून असल्याने प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी विभाग व जिल्हास्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तेवढ्याच तीव्रतेने करणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

        यावेळी पर्यावरण विभागामार्फत प्लास्टिक वापराचे होणारे विपरीत परिणाम व त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबतचे सादरीकरण करण्यात आले.
000

वृक्षजन्य तेलबिया अभियान

पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी वृक्षजन्य तेलबिया अभियान

          नाशिक दि.24:-  नाशिक उपविभागात 2017-18 मध्ये पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यात वृक्षजन्य तेलबिया अभियान राबवण्यिात येत असून त्याअंतर्गत करंज, कोकम, महुआया वृक्षजन्य तेलबिया पिकांचे  क्षेत्र व उत्पादकता वृद्धीचा अंतर्भाव आहे.
          करंज पिकासाठी प्रतिहेक्टर 500 रोपे आणि  20 हजार रुपये  लागवडखर्च अनुदान देण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षापासून देखभाल कालावधी चार वर्षे असून प्रतिवर्ष देखभाल अनुदान मर्यादा दोन हजार रुपये आहेत.
          महुआ पिकासाठी प्रतिहेक्टर 200 रोपे आणि  15 हजार रुपये  लागवडखर्च अनुदान देण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षापासून देखभाल कालावधी आठ वर्षे असून प्रतिवर्ष देखभाल अनुदान मर्यादा दोन हजार रुपये आहेत.
कोकम पिकासाठी प्रतिहेक्टर 250 रोपे आणि  15 हजार रुपये  लागवडखर्च अनुदान देण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षापासून देखभाल कालावधी सहा वर्षे असून प्रतिवर्ष देखभाल अनुदान मर्यादा दोन हजार रुपये आहेत.
रोपांची उपलब्धता कृषि विद्यापीठ किंवा सामाजिक वनीकरण यांचेकडून निर्धारीत दराने खरेदी करून शेतकऱ्यांनी लागवड करावयाची आहे. शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावे सातबारा व 8 अ असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांची निवड पंचायतराज संस्थेच्या सहभागाने करावी. विहित केलेल्या प्रमाणानुसार अनुसूचित जाती/जमाती तसेच महिला लाभार्थ्यांचा समावेश करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमांतर्गत किमान 30 टक्के महिला व 3 टक्के अपंग लाभार्थींची निवड करावी.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा आणि अधिकाधीक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन, उपविभागीय कृषी अधिकारी नाशिक यांनी केले आहे.
----

ई-स्कॉलरशीप प्रस्ताव

-स्कॉलरशीप प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

          नाशिक दि.24:-  विद्यार्थ्यांची प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, विद्यावेतने, निर्वाह भत्ता आदी अदा करण्यासाठी ई-स्कॉलरशीप हे संकेतस्थळ 21 नोव्हेंबर 2017 पासून मर्यादीत कालावधीसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
          प्रथम टप्प्यात 2015-16  आणि 2016-17 करिता दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज भरलेल्या मात्र शिष्यवृत्ती अथवा इतर शुल्काचा लाभ न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयांकडे प्रलंबित अर्ज आणि नुतनीकरण प्रस्ताव पुनरुज्जीवीत करण्यात आलेल्या संकेतस्थळावरून 30 नोव्हेंबरपर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक यांच्याकडे पाठवायचे आहेत.
          याबाबत सविस्तर सुचना आणि वेळापत्रक विभागाच्या www.sjsa.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज व नुतनीकरण प्रस्ताव त्वरेने सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.
          सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आर्थिक लाभ चालू शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टलमार्फत अदा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने सामाजिक न्याय विभागाचे http://mahaeschol.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ संस्थगित करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रस्तावानुसार लाभ देण्यासाठी ते पुनरुज्जीवीत करण्यात आले आहे.

----

Thursday, 23 November 2017

स्पर्धा परिक्षेचे विश्व

यशाचे उद्दीष्ट समोर ठेवून स्पर्धा परिक्षेची तयारी करा-संजय अपरांती


          नाशिक दि.23:-  युवकांनी यशाचे उद्दीष्ट समोर ठेवून आणि यशाची खात्री मनाशी बाळगून स्पर्धा परिक्षेची तयारी करावी, असे प्रतिपादन माजी पोलीस अधीक्षक डॉ.संजय अपरांती यांनी केले.
          मु.शं.औरंगाबादकर सभागृह येथे आयोजित ‘जिल्हा ग्रंथोत्सव 2017’ अंतर्गत स्पर्धा परिक्षेचे विश्व या  विषयावरील सत्रात ते बोलत होते. जिल्हा कोषागार अधिकारी विलास गांगुर्डे आणि जिल्हा नियोजन अधिकारी  योगेश चौधरी यांच्या उपस्थितीत दोन दिवस चाललेल्या ग्रंथोत्सवाचा समारोप झाला. यावेळी मुक्तांगण संस्था संचालक किरण मोहिते, श्रीकांत बेणी, रामचंद्र काकड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे, सहाय्यक ग्रंथालय संचालक आशिष ढोक आदी उपस्थित होते.

          श्री.अपरांती म्हणाले, स्पर्धा परीक्षा आजच्या काळासाठी खूप महत्वाची असून परिक्षेच्या तयारीसाठी वाचनाची सवय महत्वाची आहे. विविध विषयांवरील वाचनाने परिक्षेची तयारी होण्याबरोबरच व्यक्तिमत्वाचा विकासही होत असतो. युवकांनी ज्ञानकक्षा रुंदावण्यासाठी पुस्तकांकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्पर्धा परिक्षेचे महत्व, तयारीचे टप्पे, व्यक्तिमत्व विकास आदी विविध पैलूंवर त्यांनी मार्गदर्शन केले.
श्री.मोहिते यांनी व्यक्तिमत्व विकासाचे महत्व आपल्या व्याख्यानातून मांडले. स्पर्धा परिक्षेच्या मुलाखतीदरम्यान व्यक्तिमत्व आणि संवादालाही महत्व असल्याचे त्यांनी सांगितले. व्यक्तिमत्व विकासासाठी स्वयंप्रेरणा महत्वाची असल्याचे ते म्हणाले.
----


ग्रंथांनी काय दिले

नाशिक जिल्हा ग्रंथोत्सव 2017
ग्रंथांनी जीवनात लढण्याचे बळ दिले-उत्तम कांबळे

नाशिक दि.23- जीवनातील दु:ख आणि वेदना दूर करताना जिथे कुटुंब आणि व्यवस्था हारली तिथे ग्रंथांनी लढण्याचे बळ दिले आणि संकटातून बाहेर पाडण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.
          जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान जि.प. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मु.शं.औरंगाबादकर सभागृह येथे ‘जिल्हा ग्रंथोत्सव 2017’ अंतर्गत ग्रंथांनी काय दिले या विषयावर श्री.कांबळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला लेखा व कोषागरे कार्यालाच्या सहाय्यक संचालक स्वरांजली पिंगळे, नानासाहेब बोरस्ते, श्रीकांत बेणी आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे उपस्थित होते.

          श्री.कांबळे म्हणाले, जीवनातील प्रतिकूल क्षणात पुस्तकाने सन्मानाने जगायला शिकविले आणि आनंदाने जगण्याची कलादेखील शिकवली. तारुण्यात केलेल्या वाचनामुळे जीवनाला आकार मिळाला. चांगले स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन त्यामागे धावण्याची ताकद ग्रंथांमुळे मिळाली. अज्ञान दूर करून सत्याच्या अधिक जवळ जाण्याची प्रेरणा वाचनामुळे मिळाली.
          स्वत:ला व्यक्त करण्याची उर्मी मनात निर्माण झाल्यावर सृजनात्मक लेखनाची निर्मिती होत असते. निसर्गाला जाणून घेण्यासाठी लेखन करणे हा या निर्मितीचा दुसरा टप्पा आहे. जीवनातले पैलू समजावून घेत त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र ग्रंथलेखनासाठी एवढे पुरेसे नसून त्यासाठी प्रतिभा आवश्यक असते. जीवन, निसर्ग आणि माणसाविषयीचे आकलन आणि निरीक्षण लेखकाकडे असायला हवे. प्रतिभा आणि वेदनेच्या संगमाद्वारे सुंदर साहित्याची निर्मिती होते, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, जगण्याचे प्रश्न शोधण्यासाठी ग्रंथांकडे जावे लागते.  ग्रंथ प्रश्न निर्माण करायला शिकवितात. ज्या समाजात प्रश्न निर्माण होत नाही तो समाज मृतवत होतो. अलिकडच्या काळात विद्यार्थ्यांचे वाचन कमी असल्याने त्यांच्या सर्वांगिण विकासाला मर्यादा आल्या आहेत. जगण्याला अर्थ द्यायचा असेल तर विद्यार्थ्यांनी ग्रंथांना जवळ करावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीमती पिंगळे म्हणाल्या, ग्रंथ आनंद देणारा मित्र आहे. ग्रंथ हे विवेकी आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन प्रदान करत असल्याने अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा ग्रंथातून मिळते. संत साहित्याने समाजातील वाईट प्रथांवर कडाडून प्रहार केला. अशा साहित्यातून नवी मुल्य समजतात. उद्दीष्टाकडचा प्रवास सुसह्य करण्यासाठी ग्रंथांनी सहकार्य केले, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


-----

Wednesday, 22 November 2017

कवी संमेलन

नाशिक जिल्हा ग्रंथोत्सव 2017
कवितेच्या सरींनी श्रोते झाले चिंब


नाशिक दि.22- जिल्हा ग्रंथोत्सवांतर्गत  मु.शं.औरंगाबादकर सभागृह येथे आयोजित कवी संमेलनात जिल्ह्यातील कवींनी सादर केलेल्या कवितांना श्रोत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. बाप-लेकीच्या प्रेमळ नाते, मानवी जीवनाचे विविध पैलूंसह  शेतकऱ्याच्या व्यथा कवींनी आपल्या कवितेतून मांडल्या. ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे हेदेखील या काव्यसोहळ्यात रमले आणि त्यांनी कवितांना तेवढीच उत्स्फुर्त दाद दिली.

कवी डॉ. शंकर बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कवी संमेलनाच्या प्रारंभीच प्रशांत केंगणे यांनी बाप-लेकीचे नाते कवितेतून मांडताना हळूवार श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श केला.
लेक काळीज बापाचे काळजाची ती प्रेरणा,
तिच्या पायात शोधतो बाप लक्ष्मीच्या खुणा
कुणी ऐकला का सांगा कधी बापाचा हंबर
लेक सोडताना घर त्याचे फुटते अंबर
अशा ओळी ऐकताना श्रोत्यांच्या डोळ्यात अलगद अश्रु तरळले.
 राजेंद्र उगले यांनी  विठूरायाकडे पाय थकल्याने आता पंढरीची वारी होत नाही अशी तक्रार करतानाभक्तीभावाला जागून सारा शिवार डुलव असा आर्जव करणाऱ्या वारकरी शेतकऱ्याच्या भावना आपल्या कवितेतून मांडल्या.
संदीप जगताप यांना पुस्तकासाठी पुरस्कार नको होता. त्यांनी कवितेतून त्यापेक्षा वावरातल्या पिकाला जास्त भाव मिळावाअशी इच्छा व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या जीवनातला आशावाद त्यांनी  पानं गळून गेले तरी जीवंत आहे खोड, थोडी मिळाली की ओल तर मातीतून परत फुटतील मोड अशा शब्दातून प्रकट केला.

रविंद्र कांगणे यांनी हिशेब या आपल्या कवितेतून नशा पैशाची गांजील भोग डसाया येतील, तुझ्या तिजोरीचा वाटा काय यमाला देशील असा प्रश्न उपस्थित करताना मानवी संवेदना जपण्याचा संदेश दिला. तर अरुण इंगळे यांनी दु:ख बाजूला सारून जीवनाचा आनंद घेण्याचा संदेश कवितेतून दिला.

रविंद्र मालुसकर यांनी सादर केलेल्या कवी राम पाठक यांच्या नाशिकच्या कवितेने श्रोत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. विलास पगार यांनी शेतकऱ्यांच्या श्रमाची जाणीव समाजाने ठेवावी ही भावना श्रीमंत भावाला उद्देशून केलेल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली.तुझी आभाळी नजर त्याला मातीचीच गोडी या त्यांच्या ओळींना उत्स्फुर्त दाद मिळाली.

 कमलाकर देसले यांनी गझल सादर केली. माणूस होण्याचा मी घेईन अवसर नक्की, मला ईश्वरा करुणेचा दे पाझर नक्की अशा ओळी सादर करतना जुन्या आयुष्याचे क्षण मागायलादेखील ते विसरले नाहीत.
लक्ष्मण महाडीक यांच्या सुंदर सूत्रसंचालनाने मैफीलीत रंग भरला. समाजाकडून महिलांवर टाकली जाणारी बंधने प्रतिकांच्या माध्यमातून मांडताना पोरी तुला तुझ्यातून मुक्त झालं पाहिजे, आणि तुच तुझ्या आयुष्याचं नवं सुक्त लिहिलं पाहिजे असे आवाहन त्यांनी कवितेतून केले.
समारोपात डॉ. शंकर बोराडे यांनी कॉपी प्रकरणावर मार्मिक भाष्य असलेली कविता सादर केली. आपल्या अटी-शर्ती या कवितेतून त्यांनी समाजातील प्रथा-परंपरांवर भाष्य केले.
काही नवकवींनीदेखील आपल्या रचना उत्स्फुर्तपणे सादर केल्या.

-----