Monday, 30 January 2017

मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक

पदवीधर निवडणूक मतदानासाठी ओळखपत्र सोबत असणे आवश्यक
नाशिक दि.: विधान परीषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी मतदान 3 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत होणार असून मतदारांनी ओळख पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
निवडणूक आयोगाच्या 27 जानेवारी 2017 च्या आदेशान्वये ज्या मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसेल त्यांनी ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, छायाचित्र असलेले पदवी किंवा पदवीका प्रमाणपत्र, केंद्र सरकार, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम किंवा उद्योगसंस्थेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, (खाते 31 डिसेंबर 2016 रोजी किंवा तत्पूर्वी उघडलेले असावे), पट्टे किंवा प्रॉपर्टी नोंदणी छायाचित्र असलेले कागदपत्र, 31 डिसेंबरपूर्वी देण्यात आलेली छायाचित्र असलेली शिधापत्रिका, सक्षम अधिकाऱ्याद्वारे देण्यात आलेले एससी, एसटी किंवा ओबीसी छायाचित्र असलेले प्रमाणपत्र, 31 डिसेंबरपूर्वी देण्यात आलेला छायाचित्र असलेला शस्त्र परवाना, सक्षम अधिकाऱ्याने 31 डिसेंबरपूर्वी दिलेला छायाचित्र असलेला अपंगत्वाचा दाखला, आधार कार्ड अथवा रजिस्टर जनरल ऑफ इंडियातर्फे देण्यात आलेले एनपीआरचे स्मार्ट कार्ड अशा 13 पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा सोबत असणे आवश्यक आहे. ओळखीचा पुरावा असल्याशिवाय मतदान करता येणार नाही. मतदारांनी याची नोंद घ्यावी, असे  , असे निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ यांनी कळविले आहे.

----

Saturday, 28 January 2017

पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हा रुग्णालयात शुभारंभ


 नाशिक दि.29 :- जिल्हा शासकीय रुग्णालय येथे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे  यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ  बालकाला पोलिओ डोस देऊन झाला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.पी. जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशिल वाकचौरे, डॉ. पवार, राजेंद्र पोतदार आदी उपस्थित होते.
 जिल्ह्यातील आठ लाख बालकांना आजच्या एकाच दिवशी पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा कार्यरत झाली असून  राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतून पोलिओ मुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य होत आहे, असे प्रतिपादन यावेळी श्री.लांडगे यांनी केले.
जिल्ह्याभरात पोलिओ लसीकरण मोहिमेतून 8 लाख 9 हजार  641 बालकांना डोस देण्यात येणार असल्याचे श्री लांडगे यांनी सांगीतले. त्यासाठी जिल्ह्यात 4 हजार 467 बूथ उभारण्यात आले असून 11 हजार 955 वैद्यकिय अधिकारी कर्मचारी व 914 पर्यवेक्षक कार्यरत आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्र वगळता 4 लाख 42  हजार 319 बालके ही ग्रामीण भागात असून त्यांच्यासाठी 3 हजार 195 बूथ तयार करण्यात आले आहेत.
प्रत्येक बालका पर्यंत पोहोचण्यासाठी आज मोहिमेत पोलिओ डोस घेऊ न शकलेल्या बालकांना 3534 फिरत्या पथकांद्वारे घरोघर जावून डोस दिला जाणार आहे. शहरी भागात उद्यापासून 5 दिवस तर ग्रामीण भागात उद्यापासून 3 दिवस प्रत्येक घरी फिरते पथक जाईल. याव्यतिरिक्त 253 मोबाईल टिम खेड्या-पाड्यांमधील व अतिदुर्गम भागातील बालकांचा शोध घेऊन त्यांना डोस देतील. तसेच 19 रात्र पथके व रेल्वे, बस स्थानके आदी ठिकाणी 353 ट्रान्झिट टिम कार्यरत राहतील.
                                                                                                000000


Wednesday, 25 January 2017

भारतीय प्रजासत्ताकाचा 67 वा वर्धापन दिन

पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

नाशिक दि.26: भारतीय प्रजासत्ताकाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान  येथे  आयोजित राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन समारंभात पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, पोलीस विशेष महानिरीक्षक विनयकुमार चौबे, आदिवासी विकास आयुक्त राजीव जाधव,पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त डॉ.अभिषक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर आदि उपस्थित होते.

श्री.महाजन यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परेड कमांडर विजय कुमार चव्हाण, सेकंड परेड कमांडर रामदास पालशेतकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात पोलीस आयुक्तालय नाशिक, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, होमगार्ड, शहर वाहतूक शाखा, वनविभाग, अग्नीशामक दल, भोसला मिल्ट्री स्कुल, होरायझन स्कुल, वाघ गुरुजी शाळेचे स्काऊट-गाईड पथक, बँड पथक, भोसला मिल्ट्री स्कुल घोडदल, डॉग युनिट वाहन, जलत प्रतिसाद पथक, फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन वाहन, वन विभाग ॲनिमल रेस्क्यु वाहन आदि पथकांनी सहभाग घेतला. भोसला मिल्ट्री स्कुलचे प्रथमच सहभाग घेणारे आर्मी विंग मुलींचे पथक संचलनाचे विशेष आकर्षण ठरले.

संचलनाच्यावेळी  चित्ररथातून सामाजिक जागृतीचे संदेश देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छतेबाबत संदेश देणारा नाशिक महानगरपालिकेचा चित्ररथ, जिल्हा आरोग्य अधिकारी नाशिक यांचा ‘लेक वाचवा’, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील 108 क्रमांक रुग्णवाहिका, महिला बालविकासचे चाईल्ड लाईन 1098, भारत विकास ग्रुपतर्फे  लाईफ सपोर्ट 108 क्रमांक रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म आणि वॉटर टेंडर वाहन संचलानाचे आकर्षण होते. आदिवासी विभागातर्फे नृत्य पथकाने संचलनात आदिवासी संस्कृतिचे दर्शन घडविले.

कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरीक उपस्थित होते.

                                                ****

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम बैठक

समन्वयाने पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करा- राधाकृष्णन बी.


मालेगांव दि.25- राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम 29 जानेवारी रोजी राबविण्यात येणार असून पल्स पोलिओ मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी ,कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवून ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित  नियमित लसीकरण व पल्स पोलिओ मोहिम आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तहसिलदार डॉ. सुरेश कोळी,  वैद्यकिय अधिक्षक डॉ.के.एस.डांगे आदी उपस्थित होते.
श्री. राधाकृष्णन म्हणाले, पल्स पोलिओ माहिम हे राष्ट्रीय कार्य असून देशात पल्स पोलिओ मोहिम सातत्याने काही वर्षापासून राबविली जात आहे. मागील मोहिमेत मालेगांव शहराचे पल्स पोलिओ मोहिमेत 44 टक्के काम झाले असून या मोहिमेत 80 टक्क्यांपेक्षा अधिक काम होवून ही मोहिम यशस्वी करावी, असे ते म्हणाले.  नियमित लसीकरणाचे संपुर्ण डोस देणाऱ्या  व पल्स पोलिओ मोहिमेत आपल्या मुलांना डोस देणाऱ्या पालकांना सर्व शासकीय दाखले मोफत देण्यात येतील ,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मोहिमेअंतर्गत  पल्स पोलिओचा डोस 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला मिळेल यासाठी सुक्ष्म नियोजन करणाच्या सूचना त्यांनी यावेळी  सर्व वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मुस्लिम बांधवांमध्ये पल्स पोलिओ मोहिमेबाबत जनजागृती व्हावी यासाठी  सर्व मौलानांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली.  तसेच पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बैठकिस सर्व वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*************


राष्ट्रीय मतदार दिवस मालेगांव

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांनी मतदान करावे
                                               -जिल्हाधिकारी

          मालेगांव दि.25- लोकशाही बळकटीकरणासाठी युवकांनी मतदान करावे ,असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
मालेगांव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड,महाविद्यालय येथे राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तहसिलदार डॉ.सुरेश कोळी, प्रा.डॉ. सुभाष निकम, उपप्राचार्य डी.व्ही.ठाकूर, ए.एम.बिरारी, डी.एन. सोनवणे आदी उपस्थित होते.

श्री.राधाकृष्णन म्हणाले,  जनतेत मतदानांविषयी जागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने मतदार दिवसाचे आयोजन केले जाते. मतदान जागृतीत युवकांचा सहभाग महत्वाचा आहे.  18 ते 30 वयोगटातील प्रत्येक मतदार नोंदणी करून मतदान करावे. यामुळे लोकशाहीचे बळकटीकरण होईल. प्रत्येक तरुणाला पाच वर्षांनंतर ही संधी मिळत असल्याने अतिशय विचारपर्वूक आपले मतदान करावे , असे त्यांनी सांगितले.

मतदान प्रक्रियेत सर्वांचा सहभाग महत्वाचा असून प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय मतदार उपक्रमात सर्वांनी सहभागी होवून मतदार जागृतीच्या कामास सहकार्य करावे ,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महिला,तरुणांचा मतदानातील सहभाग वाढावा आणि नवीन मतदारांची नोंदणी व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात येते असे सांगून मतदारामध्ये मतदानाविषयी जागृती होवून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी युवकांनी मतदान करावे, असे आवाहन श्री. स्वामी यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थी-विद्यार्थ्यांना  मतदानाची शपथ दिली. तसेच त्यांच्या  हस्ते नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक,कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. 

राष्ट्रीय मतदार दिन

                       
                        सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणे गरजेचे- कान्हुराज बगाटे

          नाशिक दि. 25 :- सुदृढ लोकशाहीसाठी मतदारांची भूमिका महत्वाची असून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, उपजिल्हाधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, उपविभागीय अधिकारी राहूल पाटिल,  तहसीलदार गणेश राठोड आदि उपस्थित होते.

श्री.बगाटे म्हणाले, भारतातील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नि:पक्षपाती आहे. याचे श्रेय मतदारांना आहे. मतदान हा लोकशाही व्यवस्थेतील महत्वाचा पैलू आहे. मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी  निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी मतदार दिनाचे आयोजन करण्यात येते. युवकांनी या उपक्रमात सहभागी होऊन मतदानाचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचवावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य निवडणुक आयुक्तांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. प्रास्ताविकात श्री. मिसाळ यांनी मतदार दिन कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थित मतदार जागृती चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरवातीस शासकीय कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी पथनाट्याद्वारे मतदानाचा संदेश दिला. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध, रांगोळी स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिक प्रदान करण्यात आलीत.
000000


Tuesday, 24 January 2017

सक्षम करू या युवा मतदार

सक्षम करू या युवा मतदार

भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा-आकांक्षाची पुर्तता करण्याचे अनेक स्तरावर प्रयत्न करण्यात आले. 'जनतेचे राज्य' ही संकल्पना स्विकारून जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य चालविले जात आहे. योग्य निर्णय प्रक्रीयेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे. यादृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा करण्यात येत आहे.
निवडणूका हा लोकशाही प्रक्रीयेचा कणा आहे. विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असतो. म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणूकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा. योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते हे नेहमी  लक्षात ठेवायला हवे.
मतदानाच्यावेळी मतदार यादीत नावे नसल्याने मतदानाचा अधिकार बजावता आल्याचेही बऱ्याचदा निदर्शनास येते. वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर युवक-युवतींना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रोत्साहीत करावयास हवे. नोंदणीसाठी नेमका अर्ज कोठे करावा याची माहिती त्यांना उपलब्ध करुन दिल्यास वेळेवर नोंदणी होऊन मतदार यादीत नाव समाविष्ट होऊ शकेल. भारत निवडणूक आयोगाच्या या संकेतस्थळावरही नोंदणी संदर्भात सविस्तर माहिती मिळू शकते. तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतही यासंदर्भात वेळोवेळी नोंदणीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानांची माहिती मिळू शकते.
निवडणूक आयोगाने मतदानातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक ओळखपत्र तयार करण्याची विशेष मोहिम राबविली. मात्र अशा मोहिमेत 'शासनाचे काम' अशी  पद्धतीने याकडे लक्ष देता देशाप्रतीचे महत्वाचे कर्तव्य म्हणून या मोहिमेस आपला सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. केवळ आपले ओळखपत्र करुन थांबता समाजातील इतरही घटकांना याविषयीची माहिती देण्यात सुजाण नागरिकांचा पुढाकार अपेक्षित आहे. महाविद्यालयातील युवक राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अशा स्वरुपाचा जनजागृती उपक्रम प्रभाविपणे राबवू शकतात.
जनतेच्या प्रती उत्तरदायी असणारे सरकार निवडून देण्यासाठी मुक्त वातारणातील मतदान आणि त्यात अधिकाधिक नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. केवळ मतदान केल्याने असे सरकार निवडता येत नाही . तर मतदार नोंदणी, मतदान प्रक्रीया, उमेदवाराची माहिती, विविध पक्षांची धोरणे याविषयीदेखील मतदारांनी माहिती करून घेणे आवश्यक आहे. मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरुक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. अशा स्वरुपाची जागृती घडवून आणण्यासाठीच निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने विविध मतदारजागृती उपक्रमांचेदेखील आयोजन करण्यात येणार आहे. हे उपक्रम यशस्वी करून देशाच्या लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मतदार जागृतीच्या प्रयत्नात आपणही सहभागी होऊ या आणि मतदार नोंदणी प्रक्रीयेत सहभागी होऊन मतदानासाठी सज्ज होऊ या!