Friday, 5 October 2018

कायदा व सुव्यवस्था बैठक


अवैध धंद्याविरोधात कडक कारवाई करा-मुख्यमंत्री
                  

          नाशिक दि.5- अवैध धंद्याविरोधात कडक धोरणाचा अवलंब करीत शहरात ड्रग्ज आणि ग्रामीण भागात अवैध दारु विक्रीच्या विरोधात मोहिम राबवून कडक कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
          विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्याचा कायदा व सुव्यवस्थेबाबत आयोजित बैठकीत  ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री गिरीष महाजन, राज्याचे गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, राज्याचे  मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण,आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सिमा हिरे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आदी उपस्थित होते.
          श्री. फडणवीस म्हणाले, सामान्य माणसाचा पोलीस दलावरील विश्वास वाढण्याच्या दृष्टीने पोलीसांनी प्रयत्न करावे. किरकोळ गुन्ह्यांकडे दुर्लक्ष न करता त्याचा तपास त्वरीत लागेल याकडे लक्ष द्यावे.  गुणवत्ता आधारीत पोलीसींगचा विचार करणे आवश्यक आहे. जनतेला सुरक्षितेचा अनुभव यावा यासाठी आवश्यक कार्यप्रणाली राबवावी .

          अधिकाऱ्यांनी  पोलीसांशी  संवाद साधावा त्यामुळे गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. गुन्ह्यांचा तपास करतांना तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा. पोलीसांना मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन देण्यात आले असून गुन्ह्याच्या तपासासाठी  त्यांचा अधिकाअधिक उपयोग करावा. जनतेप्रती असलेली  जबाबदारी  लक्षात घेऊन काम केल्यास चांगली कामगिरी होईल, असे त्यांनी सांगितले.

पोलीसांना घरे देण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. घरासाठी शासनाकडून मिळत असलेल्या सवलतीमुळे घराची किमंत कमी होईल. ज्यांना घराची आवश्यकता आहे त्यांची यादी तयार करुन त्यांना शासनाच्या योजनेची माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले. पोलीसांच्या कल्याण कार्यक्रमाकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.
          जिल्ह्यात पोलीसदलातर्फे कायदा व सुरक्षा व्यवस्थेसाठी चांगले प्रयत्न करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तत्पूर्वी पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल आणि पोलीस अधिक्षक संजय दराडे यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीसांतर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सादरीकरणाद्वारे माहिती  दिली.
----

शहर विकास आढावा


शहर पाणी पुरवठ्यासाठी अमृत योजनेतून मान्यता- मुख्यमंत्री

       नाशिक दि.5-शहरातील गावठाणासह इतरही भागात जलवितरण प्रणाली विकसीत करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करावा, त्यास शासनाकडून मान्यता देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात शहर विकासा संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पालकमंत्री गिरीष महाजन, नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे,सिमा हिरे, डॉ.राहुल आहेर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव पी. वेलरासू, महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आदी उपस्थित होते.

          ते म्हणाले, गोदा प्रकल्पासाठी केंद्र शासन आणि इतर वित्तीय संस्थांचे सहकार्य घेण्याबाबत विचार करावा. शहर बससेवेसाठी नियोजित 200 डिझेल बसेस ऐवजी सीएनजी बसेसचा विचार केल्यास प्रदुषण कमी होण्यास मदत होईल.
ग्रीन फिल्ड डेव्हलपमेंट बाबत नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या टीमने अहमदाबादला जाऊन अभ्यास करावा. महापालिकेच्या विकास प्रकल्पाबाबत शासनाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मेट्रोच्या फिजीबीलीटीबाबत सिडकोला सूचना करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
          शहराच्या विकासासाठी जनतेशी संवाद साधावा आणि विकासकामात लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
          श्री.मुंढे यांनी शहर विकासाबाबत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इलेक्ट्रीक क्रीमेटोरीअम आणि महानगरपालिकेच्या 55 ऑनलाईन सेवांचे लोकार्पण करण्यात आले.
-----

नाशिक जिल्हा आढावा


महत्वाकांक्षी योजना वेळेत पूर्ण  करा-देवेंद्र फडणवीस

नाशिक दि.5 : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी योजनांतर्गत सुरू असलेली कामे फेब्रुवारी 2019 अखेर पूर्ण होण्यासाठी सर्व विभागांनी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्प व विकास योजनांसदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव डी.के. जैन, अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, राहुल आहेर, विभागीय आयुक्त राजाराम माने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव पी. वेलरासू, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते आदी उपस्थित होते.    

मुख्यमंत्री  म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे पूर्ण करण्यात नाशिक जिल्ह्यात चांगले काम सुरू असून घरकुलांसाठी मागणी केलेल्या उर्वरित पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुले उपलब्ध करून देत राज्यातील पहिला बेघरमुक्त जिल्हा करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने करावा. त्याचबरोबर जागेच्या उपलब्धतेअभावी कुठेही घरकुल अपूर्ण राहणार नाही यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
या योजनेतंर्गत जिल्ह्याने गेल्या तीन वर्षात राज्यात सर्वाधिक 23 हजार 68 घरकुलांची कामे पूर्ण केली असून सन 2022 पर्यंत 30 हजार अतिरिक्त घरकुलांच्या उद्दिष्टांची मागणी शासनाकडे केली असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. त्याचबरोबर नागरी भागातही अतिक्रमित जागांवरील घरकुले नियमित करतांना प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गतची कामे पूर्ण करतांना कामांचा दर्जा राखण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व सबंधितांना दिल्या. जलयुक्त शिवार अभियांनतर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून 2018-19 मधील कामांच्या निविदा प्रक्रीया तातडीने  करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात 36 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. या योजनेंतर्गत काढण्यात आलेला गाळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्यासाठी संबंधित विभागाने योजना तयार करावी. या योजनेंतर्गत राज्यात अनेक सेवाभावी संस्था काम करण्यास तयार असून या संस्थांच्यामार्फत राज्यात 10 हजार कामे करण्यात येणार आहेत, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल व राष्ट्रीय पेयजल योजनेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. ते म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात तालुकानिहाय सुरु असलेल्या योजनांची माहिती एकत्रित करून या योजना पूर्ण करण्याचा प्राधान्यक्रम ठरवावा. तसे करताना सुरगाणा, पेठ व इगतपूरी तालुक्यातील कामे लवकरात लवकर पूर्ण होईल, याचे नियोजन करावे.
 अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा  लाभ खऱ्या गरजूंना मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करावे.  अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीबाबत असणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात. विद्यार्थ्यांचे शिक्षण व परिक्षा शुल्क त्यांच्या खात्यात लवकरात लवकर कसे जमा होईल याबाबत प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्यांची कामे निवडतांना अति ग्रामीण भागातील रस्ते निवडावेत. या योजनेंतर्गत रस्त्याचे जाळे तयार करतांना रस्त्यांचा दर्जा राखला जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात ठक्कर बाप्पा योजना, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना व अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्तीचा विकास करणे या योजनांच्या माध्यमातून सुरू असलेली अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत.
 प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत प्रथम प्राधान्यातील प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. रोजगार व स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी मुद्रा बँक योजनेतंर्गत कर्ज देतांना नव्याने व्यवसाय सुरु करणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे आणि  पात्र लाभार्थ्यांस कर्ज देताना कोणत्याही प्रकारची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले. 
पावसाच्या लांबणीमुळे पीकांची पाहणी करताना तलाठी,कृषि सहायक व गामसेवक यांनी संयुक्तरित्या प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल तयार करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्यात.
जिल्ह्यात सुरु असलेले महत्वाचे विविध प्रकल्प व विकासकामांच्या माहितीचे सादरीकरण जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी केले.

000

Thursday, 4 October 2018

दीक्षांत संचलन


देशसेवेचे ध्येय समोर ठेवून कार्य करा-देवेंद्र फडणवीस

      नाशिक दि.5-महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत प्रशिक्षण घेऊन पोलीस सेवेत दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांनी देशसेवेचे ध्येय समोर ठेवून कार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
          महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक सत्र क्र.115 च्या दीक्षांत संचलन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीष महाजन, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजीत पाटील, गृह राज्यमंत्री ग्रामीण दिपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोर्जे, सह संचालक संजय मोहिते, उपसंचालक नंदकुमार ठाकूर आदी उपस्थित होते.

          श्री.फडणवीस म्हणाले, ध्येयाकरिता काम करण्याची भावना प्रलोभनापासून दूर ठेवते.  छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना स्वाभिमान शिकविल्याने ते देशासाठी लढले. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनीदेखील कोणत्याही भय किंवा दबावाला बळी न पडता आपल्या कर्तव्याचे पालन करावे.
 पोलीस दलात समाविष्ट झाल्यानंतर सामान्य माणासाचे रक्षण या एकमात्र उद्देशाने प्रेरित होऊन कार्य करावे. गुन्हेगारांना जरब बसविताना आपल्यातील माणूसपण जपणे महत्वाचे आहे. कर्तव्यापोटी काम करतांना आपल्या संवेदना जपल्यास जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे पार पाडता येईल.

          ते म्हणाले, लोकशाही मुल्यांचे संवर्धन आणि पालन महत्वाचे आहे. प्रबोधिनीमध्ये शिकलेल्या मुल्यांचा अंकुश मनावर असल्यास चांगली प्रगती करता येईल. ही मुल्ये प्रशिक्षणापुरती मर्यादीत न ठेवता कार्यक्षेत्रात उपयोगात आणावी.  तत्परता आणि संयम यांच्या समन्वयातून जीवनात परिवर्तन घडवून आणता येईल. शपथ घेतलेले पोलीस अधिकारी म्हणून काम करताना पोलीस दलाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी, असे आवाहन श्री.फडणवीस यांनी केले. पोलीस प्रशिक्षण अकॅडमी देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

          प्रास्ताविकात श्रीमती दोरजे  म्हणाल्या, 810 पुरुष व 7 महिलांनी 9 महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे व ते पोलीस सेवेत रुजू होत आहेत. अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारी ही राज्यातील एकमेव संस्था आहे. या प्रशिक्षणाचा जनसेवेसाठी उपयोग होईल,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
          सत्र क्र. 115 मध्ये पोलीस उप निरीक्षक पदाच्या 817 अधिकाऱ्यांनी  प्रशिक्षण पुर्ण करून संचलनात सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्व कुणाल चव्हाण आणि राजेश जवरे यांनी केले.

 मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते  प्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. बुलढाण्याचे राजेश ज्ञानदेव जवरे  यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून स्वॉर्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. त्यांनाच सर्वोत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी म्हणून यशवंतराव चव्हाण चषक, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी दिला जाणारा संचालक चषक  आणि अभ्यासासाठी सिल्व्हर बॅटन प्रदान करण्यात आला.
          सोलापूरच्या मारुती जगझापे यांना द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पुरस्कार तर धुळ्याच्या किरण  पाटील यांना सर्वोत्कृष्ट वर्तणुकीसाठी एस.जी. इथापे पोरितोषिक प्रदान करण्यात आले. नाशिकच्या कुणाल चव्हाण फिजीकल ट्रेनिंग, ड्रील आणि ड्रेस असे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी दिले जाणारे तीन पुरस्कार पटकाविले.

         मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते  प्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. बुलढाण्याचे राजेश ज्ञानदेव जवरे  यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून स्वॉर्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. त्यांनाच सर्वोत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी म्हणून यशवंतराव चव्हाण चषक, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी दिला जाणारा संचालक चषक  आणि अभ्यासासाठी सिल्व्हर बॅटन प्रदान करण्यात आला.
          सोलापूरच्या मारुती जगझापे यांना द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पुरस्कार तर धुळ्याच्या किरण  पाटील यांना सर्वोत्कृष्ट वर्तणुकीसाठी एस.जी. इथापे पोरितोषिक प्रदान करण्यात आले. नाशिकच्या कुणाल चव्हाण फिजीकल ट्रेनिंग, ड्रील आणि ड्रेस असे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी दिले जाणारे तीन पुरस्कार पटकाविले.
        सोलापूरचे नागेश येनपे हे रिव्हॉल्व्हर फायरिंगसाठी दिल्या जाणाऱ्या एम.एन.कामटे चषकाचे तर  जळगावच्या लक्ष्मी सपकाळे या सर्वोत्तम महिला प्रशिक्षणार्थींना दिल्या जाणाऱ्या अहिल्याबाई होळकर चषक आणि आंतरवर्ग प्रशिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले चषकाच्या मानकरी ठरल्या.
          कायदा व सुव्यवस्था हाताळणी विषयात सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी  पुरस्कार अहमदनगरच्या मंगेश बाचकर तर कायदा विषयासाठी दिला जाणारा डॉ.बी.आर.आंबेडकर चषक कोल्हापूरच्या प्रकाश कदम यांना प्रदान करण्यात आला. 


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सप्तश्रृंगी संकुलाचे उद्घाटन


          मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते प्रबोधिनीच्या परिसरातील खुले सभागृह आणि सप्तश्रृंगी संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात पाच व्यक्तींना चावी वाटप करण्यात आले.
                  यावेळी खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. देवयानी फरांदे, सिमा हिरे, बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी आदींसह वरिष्ट पोलिस अधिकारी उपस्थित होते. 

          खुले सभागृह आणि सप्तश्रृंगी संकुलांची निर्मिती महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांच्यावतीने करण्यात आली आहे. या  प्रकल्पाची किंमत 3 कोटी 60 लाख रुपये आहे. प्रशिक्षणार्थींना सांस्कृतीक कार्यक्रमासाठी सभागृहाचा उपयोग होणार आहे.

         सप्तश्रृंगी संकुलात 168 पोलीस निवासस्थानांचे बांधकाम करण्यात आले आहे. या प्रकल्पाची किंमत 41 कोटी 87 लाख रुपये आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवासासाठी संकुलाचा उपयोग होणार आहे.
-----


Monday, 1 October 2018

पत्रकार पुरस्कार


जलयुक्त शिवार पत्रकार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नाशिक, दि. 1 : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात वृत्तपत्रातून तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांना राज्य शासनाच्या वतीने राज्य, विभाग तसेच जिल्हा या तीन स्तरांवर पुरस्कार देण्यात येतात. सन 2017-18 या वर्षीच्या पुरस्कारासाठी पत्रकारांनी आपला विहित नमुन्यातील अर्ज 20 ऑक्टोबर 2018 पर्यंत तीन प्रतीत जिल्हा माहिती कार्यालय येथे सादर करावेत.
जलयुक्त शिवार अभियानाबाबत जनजागृती, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करून पाणी प्रश्न सोडविण्यात योगदान देणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात येतो.
राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागीय स्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, तर जिल्हा स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावाने पुरस्कार देण्यात येतात.  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अ, ब, क वर्गवारीतील वृत्तपत्रे, नियतकालिके यामधून 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच  विचार करण्यात येईल.
मुद्रित माध्यम गटासाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येतील. यामध्ये जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाला 31 हजार, द्वितीय क्रमांकास 21 हजार, तृतीय क्रमांकास 15 हजार, विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकाला 50 हजार, व्दितीय क्रमांकाला 35 हजार, तृतीय क्रमांकाला 25 हजार, तर राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाला एक लाख, द्वितीय क्रमांकाला 71 हजार, तर तृतीय क्रमांकाला 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रानिक माध्यमातील मराठी वृत्तकथा प्रसारित करणाऱ्यांना राज्यस्तरावर तीन पुरस्कार देण्यात येतात. त्यामध्ये प्रथम क्रमांकास 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 71 हजार, तर तृतीय क्रमांकास 51 हजारांचे बक्षीस देण्यात येते.
मुद्रित माध्यम गटासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तंभलेखक, मुक्त पत्रकार या पुरस्कार स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असतील. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रसिध्द केलेल्या साहित्याचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल. उमेदवारास ज्या स्तरावरील पारितोषिकासाठी अर्ज करावयाचा आहे, त्या स्तरावरील समितीच्या सदस्य सचिवांकडे अर्ज करता येईल. मात्र, कोणत्याही एका पारितोषिकासाठीच अर्ज करता येईल. एका वृत्तपत्राच्या एका आवृत्तीच्या एकाच पत्रकारास या स्पर्धेत भाग घेता येईल. एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी संबंधित जिल्ह्यातून प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे, नियतकालिके यांमध्ये प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच विचार केला जाईल.
पुरस्कारासाठी मागील पाच वर्षाची कामगिरी, त्याची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. सलग दोन वर्षे एकाच पत्रकारास पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याचा प्रस्ताव स्विकारला जाणार नाही.
स्पर्धेत भाग घेत असलेल्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच कोणाचेही शिफारस पत्र जोडण्याची आवश्यकता नाही. पुरस्कारासाठी पाठवायच्या प्रस्तावासोबत मूळ लिखाणाची कात्रणे त्यांच्या दोन प्रतीसह पाठवावे लागतील. स्पर्धेसाठी पाठविलेला प्रस्ताव,त्यासोबत पाठविलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे आवश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड केलेली कात्रणे, न वाचता येणाऱ्या प्रस्तवांचा विचार केला जाणार नाही, असे प्रस्ताव रद्द समजले जातील.
पुरस्कार पात्रतेच्या अटी व शर्तीच्या अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय पाहावा. प्रत्येक स्तरावरील पुरस्कारासाठी एकापेक्षा अधिक प्रस्ताव सादर केल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.  1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या कात्रणांसह आपला प्रस्ताव 20 ऑक्टोबर 2018 पूर्वी जिल्हा माहिती कार्यालय, 3 रा मजला, सारडा संकुल, नाशिक येथे सादर करावा, असे जिल्हा माहिती अधिकारी  डॉ.किरण मोघे  यांनी कळविले आहे.

00000


पर्यटन संकेतस्थळ



पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध संस्थांशी करार

      नाशिक दि.1- जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्याबरोबर विविध संस्थांशी करार करण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हा प्रशासन आणि ‘यात्रा डॉट कॉम’ या संस्थेदरम्यान करार करण्यात आला.
          जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.  यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या या करारावर जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांनी  प्रशासनाच्यावतीने स्वाक्षरी केली. करारानंतर ही संस्था प्रशासनाच्या संकेतस्थळाशी तोडली जाणार आहे. असेच करार पर्यटन क्षेत्राशी निगडीत एअर बीएनबी, झूम कार, ओला या संस्थांसोबतदेखील करण्यात येणार आहेत.
          जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पर्यटनस्थळाची माहिती देण्यासाठी www.unravelnashik.com  हे संकेतस्थळ विकसीत करण्यात येत असून 12 ऑक्टोबर रोजी त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर जिल्ह्याची पर्यटन विषयक माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
          संकेतस्थळामुळे पर्यटकांना फायदा होणार असून एकाच ठिकाणी सर्व सुविधांची माहिती मिळणार आहे. पर्यटनस्थळे, निवासाची ठिकाणे, स्थानिक भोजन, स्थानिक उत्सव आदी विविध प्रकारची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळामुळे स्थानिकांना रोजगार मिळण्यासही मदत होणार आहे. विशेष प्रकल्प आढावा बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी केलेल्या संकेतस्थळाच्या सादरीकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले होते.
----

मॅन ऑफ द इयर


पालकमंत्री गिरीष महाजन यांना ‘मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार

       नाशिक दि.1- ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल मरीन लाईनतर्फे देण्यात येणारा ‘मॅन ऑफ द इयरपुरस्कार वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांना आरोग्य सेवा व जलसंपदा क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला.  मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्य्रमाला वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
          यापूर्वी या पुरस्काराने माजी प्रधानमंत्री कै.मोरारजी देसाई, कै.गोपीनाथ मुंडे, कै.आर.आर.पाटील, राम नाईक, नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, नाना चुडासमा, डॉ.बी.के. गोयल, डॉ.रमाकांत पांडा यांना सन्मानित करण्यात आले आहे.
          याप्रसंगी जेसीआयच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करून  श्री.महाजन म्हणाले, केरळमध्ये आरोग्यसेवा देताना कोणत्याही संकटात मदतीला धावून जाण्याची परंपरा महाराष्ट्राने जपली आहे. युवा पिढीने आत्मकेंद्रीत न राहता देशाच्या विकासाचा प्राधान्याने विचार केल्यास भारत महासत्ता म्हणून उदयास येईल. राष्ट्रनिर्मितीसाठी युवकांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
 सिंचन क्षेत्रात उल्लेखनीय  कामे झाली असून अद्यापही बरीच कामे करावयाची आहे, असे त्यांनी सांगितले. गरीब रुग्णांची सेवा करताना वेगळे समाधान मिळत असल्याने त्या क्षेत्रात कार्य सुरू असल्याचे श्री.महाजन म्हणाले.
----