Monday, 3 October 2016

जलयुक्त शिवार

अंदरसूलला जलयुक्त शिवारमुळे दुष्काळ झाला दूर
प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून अनेक वर्षानंतर शिवारात पाणी

नाशिक दि.3-येवला तालुक्यातील अंदरसूल गावचा मेळनाला दुथडी भरून वाहतोय. बंधावरून पाणी वाहतांना पाहून शेतकरी आनंदीत झाले आहेत. परिसरात हिरवीगार पिके उभी राहीलेली दिसतात. विहिरींना जमिनीलगत पाणी लागल्याचे चित्र परिसरात आहे. प्रशासनाचा पुढाकार आणि लोकसहभागातून जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविली गेल्याने यंदाचा रब्बी हंगामही चांगला जाणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

येवला तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षात दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. अंदरसूल गावाला तर उन्हाळ्यात टँकरशिवाय पर्याय नव्हता. पिण्याच्या पाण्याची समस्या असताना शेतीसाठी पाणी मिळणे कठीणच होते. मेळाचा नाल्यावरील जुन्या बंधाऱ्यात वर्षानुवर्षे गाळ साचल्याने फारसा पाणीसाठा होत नव्हता. बंधाऱ्याची उंची यशवंत ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत  वाढवूनही साचलेल्या गाळामुळे फारसा लाभ झाला नाही. त्यामुळे परिसरातील वाड्यांनाही तीव्र पाणीटंचाई जाणवत असेशेतकऱ्यांची सर्व भिस्त खरीपावर होती.

 ही परिस्थिती बदलण्यासाठी उपविभागीय अधिकारी वासंती माळी यांच्या मार्गदर्शनाखाली  बाजार समितीचे संचालक मकरंद सोनवणे आणि इतर ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत  जलयुक्त शिवार योजने अंतर्गत  गाळ काढण्याचे काम हाती घेतले.

कोळगंगा आणि मन्याड या दोन प्रवाहांचा मेळ होत असल्याने हा नाला मेळाचा नाला म्हणून ओळखला जातो. या नाल्याची एकूण क्षमता 42 टीसीएम होती. मात्र गाळामुळे केवळ 10 टीसीएम पाणीसाठा होत असे. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत एबीबी कंपनीने सीएसआर अंतर्गत दोन पोकलॅाड यंत्र उपलब्ध करून दिले. डिझेलसाठी योजनेअंतर्गत 2.80 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले.

नाल्याच्या 670 मीटर पात्राचे खोलीकरण आणि रुंदीकरणे करण्यात आले. गाळ काढण्यात आल्याने 32 टीसीएम पाणीसाठा वाढला. एवढ्या क्षमतेचा बंधारा बांधण्यासाठी किमान 12 लाख खर्च आला असता, असे उपअभियंता हरिश्चंद्र पवार  यांनी सांगितले.

 शेतकऱ्यांनी बंधाऱ्यातून काढलेला गाळ शेतासाठी उपयोगात आणला. या गाळाने झालेल्या भरावावर काही ठिकाणी तूर आणि भुईमुग लागवडदेखील करण्यात आली आहेकोळगंगा पात्रावर असलेल्या टेकेश्वरी बंधाऱ्याची उंची वाढवून त्याठिकाणीदेखील गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमता 19.81 टीसीएमने वाढली आहे. याठिकाणी 9 दिवसात 450 मीटर नदीपात्रातील गाळ काढण्यात आला. शासनातर्फे डिझेलसाठी 2 लाख 91 हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले.

पाणीसाठा वाढल्याने परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अंदरसूल बरोबरच गवंडगाव आणि बोकटे शिवारालाही या पाण्याचा उपयोग होणार आहे. एकूण 500 एकर शेती यामुळे बहरणार आहे. या पाण्यावर दुसरे आणि शक्य झाल्यास उन्हाळ्यात भाजीपालादेखील घेता येईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला. अत्ंयत कमी खर्चात मोठा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने जलयुक्तशिवार योजनेचे महत्वदेखील अधोरेखित झाले आहे.
चंद्रकांत देशमुख, शेतकरी-पूर्वी पावसाच्या भरवशावर रहायचो. जलयुक्तचं  लय भारी काम झालं. आधी असं काम पाहिलं नव्हतं. कामे मस्त झाली आहेत. उन्हाळी कांदा घेणे आता शक्य होणार आहे.

वासंती माळी, उपविभागीय  अधिकारी-हे यश  लोकसहभागाचे आहे. स्थानिक नागरिकांनी खुप मेहनत घेतली. काहींनी आर्थिक योगदानही दिले. कायम दुष्काळाच्या छायेत रहाणाऱ्या या भागात आता पाणी टंचाई रहणार नाही, असा विश्वास वाटतो. अनेक वर्षानंतर गाळ काढण्याचे काम झाले आहे. प्रशासन आणि नागरिक एकत्र आले तर योजना चांगल्या पद्धतीने राबविता येते याचे अंदरसूल उत्तम उदाहरण आहे.






Saturday, 1 October 2016

स्वच्छता मोहिम

पोलीस वसाहतीत स्वच्छता मोहिमेचे आयोजन
नाशिक दि. 2 -: राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस वसाहत येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

          पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.   यावेळी आमदार देवयानी फरांदे, पोलीस उपयुक्त विजय पाटील, महानगरपालिका विभागीय अधिकारी (पश्चिम विभाग) नितीन नेर, उपअभियंता  सचिन जाधव, स्वच्छता निरीक्षक परमार, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, सहाय्यक अभियंता सचिन पाटील, शाखा अभियंता अजय देशपांडे आदी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती फरांदे यांनी डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता महत्वाची असल्याचे सांगून नागरिकांनी परिसर स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले.

महात्मा गांधींच्या विचारांचे अनुसरण करून राष्ट्र स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत, असे श्री. सिंघल यांनी  सांगितले. शहर स्वच्छतेसाठी  समाजामध्ये जनजागृती आवश्यक असून त्यासाठी विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.


यावेळी  उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलीस वसाहत परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

शेत बहरले...

शेत बहरले...
शेतीला सिंचनाची सुविधा करण्यासाठी नवनाथ कवडे यांनी  मागेल त्याला शेततळे योजनेतून शेततळ्याची निर्मिती केली आहे. शेततळ्यामुळे शेतील पाणी उपलब्ध झाले असून उत्पादन वाढून  कवडे यांच्या  आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे.

          नवनाथ कवडे यांनी शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून चांदवड तालुक्यात असलेल्या वाकी बु. या लहानशा गावात शेततळ्याची उभारणी केली आहे.  शेततळे तयार होण्यापूर्वी पाणीटंचाईमुळे त्यांनी रब्बी हंगामात पीके घेताना अडचणी येत होत्या. तसेच खरीपातही दुष्काळामुळे उत्पादनावर परिणाम होत असे.  शेतातले सर्व उत्पादन निसर्गावर अवलंबून होते. पावसाच्या अनिश्चिततेमुळे अनेकदा आर्थिक नुकसानही सहन करावे लगे.

 त्यांना शेततळ्यासाठी कृषि विभागाकडून 50 हजाराचे अनुदान देण्यात मिळाले.  या अनुदानातून त्यांनी 160 बाय 100 आकारात शेततळे तयार केले. शेततळ्यात 40 लाख लिटर एवढा पाणीसाठा झाला आहे. त्याशिवाय पाणी जीरत असल्याने शेतातील वहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पाण्याच्या अभावाने केवळ 30 टक्के उत्पादन घेता आले मात्र यावर्षी पाण्याच्या उपलब्धतेमुळे उत्पादनात वाढ झाली आहे.

शासनाने सुरू केलेल्या या योजनेमुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. पाण्याची चिंता दूर झाल्याने शेतात उत्पादन वाढविण्यासाठी प्रयोग करता येतील. त्याचा आर्थिक फायदाही मिळू शकेल.-नवनाथ कवडे

उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी फेब्रुवारी 2016 मध्ये शासनाने  ”मागेल त्याला शेततळे” योजनेस मंजूरी दिली. नाशिक जिल्ह्यात या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शेततळ्यांपासून मिळणाऱ्या लाभामुळे अनेक शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत.

  चांदवड तालुक्यात 315 शेततळ्याचे प्रस्ताव मंजूर झाले असून  137 लाभर्थ्यांना 50 हजार प्रमाणे अनुदान प्राप्त झाले आहेत. एकूण 286 शेतकऱ्यांना शेततळ्यांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. तालुक्यात विशेषत: कांदा, टोमॅटो आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा विशेष लाभ होणार आहे. त्यामुळेच  योजनेचे शेतकरी वर्गातून स्वागत केले जात आहे.