Monday 11 March 2019

कायदा व सुव्यवस्था आढावा


   जिल्हाधिकाऱ्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
 
नाशिक, दि. 11- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.
 यावेळी पोलीस अधीक्षक आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, रागसुधा आर., अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, लक्ष्मण  राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास  खेडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर  आदी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत समन्वयाने नियोजन करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. प्रतिबंधक कारवायांबाबत विहीत कार्यपद्धती अवलंबून प्रकरणांवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी विधानसभा मतदारसंघनिहाय मनुष्यबळ, ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जागृती, मतदान केंद्र, जिल्हा निवडणूक संवाद आराखडा, वाहतूक आराखडा याविषयी आढावा घेण्यात आला. सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश श्री.राधाकृष्णन यांनी दिले.
बैठकीला सहायक निवडणूक अधिकारी, तहसीलदार, समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

************

विभाग प्रमुख बैठक


आदर्श आचारसंहितेचे कटाक्षाने पालन करावे-जिल्हाधिकारी

नाशिक, दि. 11 :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून शासकीय अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे काटोकरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक आरती सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे, अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, लक्ष्मण  राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास  खेडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर आदी उपस्थित होते.

श्री.राधाकृष्णन म्हणाले, मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदान होण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन होणे आवश्यक आहे. आचारसंहितेचे पालन  योग्यप्रकारे झाल्यास निवडणूक प्रक्रीयेच्या पारदर्शकतेविषयी नागरिकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण होते. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रीयेसाठी तयार केलेल्या ई-सुविधांची माहिती संबंधिताना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले,धर्म, जात आणि पंथाच्या आधारे मतदारांना आवाहन करता येणार नाही. मतदानापूर्वी 48 तास प्रचार बंद राहील. प्रचार मिरवणूकीसाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मिरवणूकीत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतल्यानंतर एकावेळी 10 वाहने सहभागी होतील. अधिक वाहने असल्यास प्रत्येक 10 वाहनांमध्ये 100 मीटरचे अंतर असेल.
प्रशासनाच्या अनुमतीने मतदान केंद्रबाहेर बुथ लावताना केवळ एक टेबल आणि दोन खुर्च्या ठेवण्यास  परवानगी असेल. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारास सोबत केवळ तीन वाहने आणण्याची अनुमती असेल. ही  वाहने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयापासून 100 मीटर अंतरावर राहतील. प्रचारासाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रकाशनांवर प्रकाशक आणि प्रतींचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. प्रचारासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा उपयोग राजकीय पक्षांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेची माहिती देण्यात आली. निवडणूक प्रक्रीया पारदर्शकपणे आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे,असे आवाहन श्री.राधाकृष्णन यांनी केले.
बैठकीस भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आदी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 *****************

Saturday 9 March 2019

व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक


ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत प्रात्यक्षिकाचे आयोजन


नाशिक, दि. 9 - आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्याच्या अनुषंगाने प्रसारमाध्यम  आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसाठी  ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटयंत्राबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.

 यावेळी मनपा उपायुक्त रोहिदास बहिरम, जिल्हा क्रिडा अधिकारी रविंद्र नाईक, तहलिसदार (निवडणुक) प्रशांत पाटील, तहसिलदार अनिल दौंडे,  नायब तहसिलदार सविता पठारे आणि तंत्रशिक्षण विभागाचे तांत्रिक सहाय्यक उपस्थित होते.  

ईव्हीएम यंत्रांविषयी आणि निवडणूक प्रक्रीयेच्या पारदर्शकतेविषयी सर्वसामान्य मतदारांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये आणि ईव्हीएम व व्हीव्हीपॅटविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्यादृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची माहिती देण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले.

मतदानाचेवेळी बॅलट युनिट, कंन्ट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट असे तीन युनिट मिळून मतदान प्रणाली तयार होईल. ही प्रणाली पुर्णत: मतदानासाठी तयार आहे हे दर्शविण्यासाठी सात प्रकारचे रिपोर्ट स्लिपच्या स्वरुपात व्हीव्हीपॅटमधून प्राप्त होतील. मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट यंत्रात सात सेकंदापर्यंत मतदान कोणत्या उमेदवाराला केले आहे हे दर्शविणारी स्लिप दिसणार आहे. ही स्लिप नंतर व्हीव्हीपॅट यंत्रात संकलीत होईल. त्यामुळे मतदाराला योग्यरितीने मतदान झाल्याची खात्री करता येणार आहे. या संपूर्ण प्रक्रीयेची माहिती तज्ज्ञांनी यावेळी दिली.

************

Friday 8 March 2019

मतदारांना स्मार्ट ओळखपत्र


दोन लाख मतदारांना मिळणार स्मार्ट निवडणूक ओळखपत्र

नाशिक, दि. 8 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेतर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत असून दोन लाखापेक्षा अधिक नवमतदारांना स्मार्ट निवडणूक ओळखपत्र देण्यात येणार आहे.

एकूण 2 लाख 6 हजार 156 स्मार्ट ओळखपत्र प्राप्त झाले असून निवडणूक शाखेतर्फे विधानसभा मतदार संघनिहाय वितरीत करण्यात येत आहेत. नांदगाव 12371, मालेगाव मध्य 23615, मालेगाव बाह्य 12778, बागलाण 12841, कळवण-सुरगाणा 9925, चांदवड-देवळा 9293, येवला 11147, सिन्नर 11917, निफाड 11325, दिंडोरी-पेठ 14452, नाशिक पुर्व 20047, नाशिक मध्य 18278, नाशिक पश्चिम 15005, देवळाली 12167 आणि इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात 10995 ओळखपत्रांचे वाटप समन्वय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.

ओळखपत्रामुळे मतदान करणे सुलभ होणार असून मतदार म्हणून नव्याने नोंदणी केलेल्या नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) नवीन स्मार्ट निवडणूक ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी कळविले आहे.
-----

Thursday 7 March 2019

आदर्श आचारसंहिता


आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी सज्ज रहावे-जिल्हाधिकारी
नाशिक, दि. 7 :- आगामी लोकसभा निवडणुक प्रक्रीयेदरम्यान आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी निवडणूक यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे.
निवडणूक कामकाजासाठी 23 प्रकारच्या समित्यांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक समितीसाठी स्वतंत्र समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. समित्यांना निवडणूकीची पूर्वतयारी येत्या एक-दोन दिवसात पुर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यावर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजवणी करण्याबाबत सर्व सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी यांना निर्देशित करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण झालेल्या क्षेत्राचे आणि ठिकाणांचे सर्वेक्षण होणार असून निवडणूक जाहीर झाल्यावर त्याबाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. निवडणूकीदरम्यान असे आढळल्यास गुन्हा दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. न्यायालयाने फरार घोषित केलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी आवश्यक माहिती पोलीस विभागाकडून मागविण्यात आली आहे.
विभागस्तरावर समन्वय कक्षाची स्थापना

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार नाशिक विभाग स्तरावर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता विभागस्तरावर निवडणूक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष निवडणूक कामांचा आढावा घेण्याचे व समन्वय साधण्याचे काम करणार आहे.
 विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या आदेशानुसार उपायुक्त रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कक्ष कार्यरत रहाणार आहे. यात सहायक आयुक्त उन्मेश महाजन, मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांच्यासह तहसीलदार व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आहे.
-----

Tuesday 5 March 2019

निवडणूक ओळखपत्र


मतदानासाठी निवडणूक ओळखपत्र व्यतिरिक्त 11 पुरावे ग्राह्य धरणार


नाशिक दि.5-आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करताना मतदाराची ओळख पटविण्यासाठी निवडणूक मतदान ओळखपत्र नसल्यास इतर 11 पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
मतदाराची ओळख पटविण्यासाठी निवडणूक मतदान ओळखपत्र आवश्यक आहे. ओळखपत्र नसल्यास इतर अकरा पुराव्यापैकी एक सादर करावे लागणार आहे. यात पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र शासन/ राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी कंपन्या अथवा कारखाने यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबूक, आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र, जनगणना आयुकत्‍ यांनी दिलेले ओळखपत्र, रोजगार हमी योजनेमधील जॉबकार्ड, कामगार मंत्रालय यांचेकडील आरोग्य कार्ड, निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन पासबुक किंवा पेन्शन पेमेंट ऑर्डर, आमदार/खासदार यांना दिलेले ओळखपत्र आणि आधार कार्ड यापैकी एक कोणताही पुरावा ग्राह्य धरला जाईल.
.
 यापूर्वी आधार कार्ड व्यतिरिक्त 17 पुरावे ग्राह्य धरण्यात येत होते. येत्या लोकसभा निवडणुकीत मात्र वरील 11 पैकी एक ओळखपत्र असल्यास मतदान करता येईल. पुर्वीप्रमाणे मालमत्तेबाबतची कागदपत्रे, शस्त्रास्त्र परवाना, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विधवा/अवलंबिता प्रमाणपत्र, अपंगत्वाचा दाखला, स्वातंत्र्य सैनिकांचे ओळखपत्र व रेल्वे पासचे ओळखपत्र  ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, असे जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक यांनी कळविले आहे.


समन्वय अधिकारी बैठक


समन्वय अधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी सूक्ष्म नियोजन करावे- जिल्हाधिकारी


नाशिक दि.5- लोकसभा निवडणुकीसाठीची कामे योग्यरितीने आणि कालमर्यादेत होण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करीत जबाबदारीने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या निवडणूक समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, नितीन राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर आदी उपस्थित होते.
श्री.राधाकृष्णन म्हणाले, निवडणूक प्रशिक्षणाची पूर्ण माहिती घेऊन त्याचे व्यवस्थित नियोजन करण्यात यावे. आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या पालनाबाबत विशेष लक्ष देऊन दररोज अहवाल सादर करण्यात यावा. कार्यालय प्रमुखांनी सर्व कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक शाखेकडे द्यावी. या निवडणूकीत निवडणूक आयोगाकडून खर्च निरीक्षक स्वतंत्रपणे नियुक्त करण्यात येणार  असल्याने निवडणूक खर्चावर विशेष लक्ष द्यावे. गुरुवारी अधिकृत दर जाहीर करण्यात येणार असून त्यानुसार खर्च होत असल्याबाबत पडताळणी करावी. अधिकृत दराबाबत राजकीय पक्षांना माहिती देण्यात येणार असून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, नामांकन भरताना तीन वाहनापेक्षा अधिक वाहने आणता येणार नाही. अशावेळी वाहने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयापासून 100 मीर अंतरावर उभी करावी लागतील. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत नियुक्त समितीने विशेष दक्षता घ्यावी. विहित पद्धतीने यंत्रांची तपासणी लक्षपूर्वक करावी. सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी निवडणूक शाखेच्या सुचनेनुसार कामे करावीत, असे त्यांनी सांगितले.
श्री.सागर म्हणाले, लोकसभा निवडणूकीत उमेदवारासाठी 70 लाखाची खर्च मर्यादा आहे. खर्चाबाबत नियुक्त समितीने उमेदवाराच्या निवडणूक खर्चाची योग्यरितीने तपासणी करावी. खर्चाच्यादृष्टीने संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती संकलित करावी. उमेदवाराने दाखविलेल्या खर्चाबाबत शंका असल्यास त्याचे तातडीने स्पष्टीकरण मागवावे.
श्री.आनंदकर म्हणाले, पोलीस, प्रादेशिक  परिवहन अधिकारी , उत्पादन शुल्क आणि महसूल विभागाने खर्चाच्यादृष्टीने संवेदनशील मतदानकेंद्रांची माहिती तातडीने द्यावीत. खर्चाबाबत तक्रार असल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. भित्तीपत्रकाची परवानगी घेतली नसल्यास गुन्हे दाखल करावे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ऑनलाइन व्यवहारावर बँक अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. उमेदवारासाठी निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. जाहीरसभेच्या परवानगीसाठी 'सुगम' आणि 'सुविधा' ॲप सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
निवडणूक जाहीर झाल्यावर सुरु असलेल्या विकासकामांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावी असे श्री.राऊत यांनी सांगितले.
श्री.खेडकर म्हणाले, शासकीय किंवा अधिकारातील जागेत प्रचार करता येणार नाही. असे आढळल्यास गुन्हे दाखल करावे.
-------